बाबा माझे Guardian Angel

।। ॐ श्री साई अनंत।।

बाबा ह्या शब्दातचं सर्व काही येऊन जातं. जसं आई ह्या शब्दात माया, ममता, प्रेमाची एक ऊब असते तशीच बाबा ह्या शब्दात मला धीर जाणवतो.  आपल्या पाठीशी एक GUARDIAN ANGEL असल्याची जाणीव येते.

अशीच जाणीव मला २००८ मध्ये झाली.

मी देवबाबांना २००७ मध्ये introduce झालो होतो. पण तेव्हा बाबांना असं पाहिलं नव्हतं (देवाच्या रुपात). नुपुरच्या घरात देवबाबांचं करतात, ती एक दैवी शक्ती आहे म्हणून मी त्यांना नमस्कार करायचो. मी तसा सहसा आपले मूळ देव सोडून दुसऱ्या देवस्वरूप व्यक्तींवर सहज विश्वास ठेवणाऱ्यातला नाही. पण मला माझ्या इंजिनीअरिंग च्या शेवटच्या वर्षाला असताना जेव्हा बाबांचा अनुभव आला त्यानंतर माझा त्यांच्यावर विश्वास जडला. नुपूरच्या आईंनी म्हणजे मम्मांनी (किर्ती दोंदे) देवबाबांनी सांगितलं म्हणून माझ्यासाठी पंचमुखी रुद्राक्षावर ११००० जप साधना करून मला गळ्यात घालायला दिला. आता मी तो नुसताच रुद्राक्ष म्हणून घातला आणि त्याहून जास्त नुपुरच्या आईंनी फक्त आपल्यासाठी ह्यावर एवढा जप केलाय म्हणून त्यांच्या श्रद्धेला एक appreciation म्हणून घातला. (ह्या रुद्राक्षाशी निगडित अनुभव पुढे येईलच.)

२००८ साली इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या कंबर दुखीच्या कारणामुळे मला कॉलेज मध्ये फार वेळ बसणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे मला रोज कॉलेज मध्ये जाणं जमत नसे आणि त्यामुळे माझं नाव defaulter’s list मधे आलं. ह्या आधी कधीही हे झालं नव्हतं. याआधीच्या सगळ्या परीक्षां मध्ये मी distinction मिळवलंय, त्यामुळे फक्त शारीरिक त्रासामुळे जर माझं एक वर्ष वाया गेलं तर माझा track record बिघडण्याची भीती माझ्या मनात होती. खूप प्रयत्न केले मी माझ्या प्राध्यापकांना माझी अडचण समजवून सांगण्याची, पण त्या प्राध्यापकांपैकी एक प्राध्यापक (प्रा. गांधी) माझी अडचण समजून घ्यायला तयार नव्हते आणि विशेष म्हणजे ते प्राध्यापक आमच्या विषयाशी संबंधित पण नव्हते. मला इतर प्राध्यापकांशी बोलायची संधी मिळाली तेव्हा ते सुद्धा तिथेच असायचे त्यामुळे मी काही बोललो तरी त्याचा कुणावर फरक पडत नव्हता. एक दिवस मी पुन्हा तेच सांगण्यासाठी स्टाफ रूम मध्ये गेलो असताना, एक प्राध्यापक वैतागून मला म्हणाले की उद्या आपण प्रचार्यांच्या ऑफिस मध्ये तुझा आईवडिलांसमक्ष यावर सविस्तर चर्चा करू. आता माझी खूप पंचाईत झाली कारण जे मला ह्या सगळ्या प्राध्यापकांना समजावता येत नव्हतं ते आता थेट प्राचाऱ्यांसमोर सांगायचे होते. मी अक्षरशः हतबल होऊन हॉस्टेल वर परतलो. अचानक विचार करत बसलो असताना मला पहिल्यांदा देवबाबांच्या कृपेचा अनुभव मिळाला. कोणीतरी कानात कुजबुजलं, “अरे गळ्यात एवढा रक्षणासाठी रुद्राक्ष दिलाय कशाला घाबरतोस? कर प्रार्थना त्या रुद्राक्षाला आणि मग भेट उद्या प्राचार्यांना”. मी जरा घाबरलोच कारण हे असं ह्या आधी कधी झालं नव्हतं, दुसऱ्या दिवशी आई पुण्यात आल्यावर तिला घेऊन प्रचार्यांकडे गेलो. प्राचार्यांना मी सर्व परिस्थिती सांगितली, माझी शारीरिक स्थिती समजावून सांगितली. सोबत प्रा. गांधी देखील होतेच, त्यांनी नेहमीप्रमाणे मला विरोध करण्यास सुरुवात केली. पण आश्चर्यकारकरित्या, मला जे अपेक्षित नव्हतं ते झालं. आमचे प्राचार्य स्वतः म्हणाले, “तु काळजी करू नकोस, तुझे आधीच्या वर्षांचे निकाल बघता मी तुझ्या attendance आणि submission वेळेत पूर्ण न होऊ शकण्याची कारणं समजू शकतो. आता मी फक्त तुझ्या पुढल्या एक महिन्याच्या attendance वर लक्ष देतो. जर पुढल्या संपूर्ण महिन्यात तुझी attendance पूर्ण असेल तर तुला मी माझा शब्द देतो कि तुला कोणतीच समस्या निर्माण होऊ देणार नाही”. हे ऐकल्यावर मी खूपच आश्चर्यचकित झालो कारण ही समस्या इतक्या सहजपणे सुटू शकेल असं वाटलंच नव्हतं. पण असो, ती सुटली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी बाबांनीच मला मदत केली. त्यावेळेस आमच्या प्राचार्यांच्या मुखांतून जणू काही देवबाबाच बोलले असं मी समजतो. 

  एप्रिल २००८ मध्ये Volkswagen मध्ये नोकरी मिळाली. मी इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला असताना, MIT कॉलेज मध्ये walk in interviews असल्याचे circular आले. मी तर Volkswagen चं नाव ऐकूनच interview देण्यासाठी तयार झालो. ज्या दिवशी MIT मध्ये interview ला गेलो तेव्हा तिथे आणखीही एकूण २२० उमेदवार आले होते.  MIT, Sinhgad institute, PCCOE आणि इतरही अनेक दुसऱ्या कॉलेजचा सहभाग होता. मला तेव्हा वाटलं, कि एवढ्या २२० उमेद्वारांमध्ये आपला निभाव कसा लागेल? खात्री वाटत नव्हती कारण हा नुसता पहिला interview नसून एका खूप मोठ्या आणि नावाजलेल्या जर्मन ब्रँड साठीचा interview होता. इंटरव्ह्यू प्रोसेसची सुरुवात झाली आणि मी एकामागोमाग एक VW चे Entry questionnaire, Aptitude, Group Discussions, Personal Interview पार केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतच गेला. शेवटी माझ्या परिश्रमांमुळे आणि बाबांच्या कृपेने माझी VW मध्ये निवड झाली. एकूण फक्त ६ मुलांची निवड झाली आणि त्यातला एक मी होतो.

              शेवटचं वर्ष संपवून नोकरी मिळाली ह्या आनंदात मी जॉइनिंगच्या तारखेची वाट पाहात कर्जतला आई बाबांसोबत वेळ घालवत होतो. ज्या तारखेची मी आतुरतेने वाट पाहात होतो ती मिळत नव्हती म्हणून मी चिडचिड करत होतो. पण त्याचवेळी मला आयुष्यातल्या एका कटू सत्याला सामोरं जावं लागलं. ऑगस्ट २००८ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे माझे बाबा अचानक आम्हाला सोडून गेले. दुःख आणि असुरक्षितता काय? हे तेव्हा अनुभवले. काही दिवस गेले मग थोड़ा विचार केला आणि लक्षात आले. देवबाबांनी माझं जोइनिंग लांबवलं, मुद्दाम. त्या विलंबामुळेच मला माझ्या बाबांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्यासोबत वेळ घालवता आला. कारण एप्रिल मध्ये माझी परीक्षा संपवून मी घरी गेलो आणि तिथेच त्यांच्यासोबत राहात होतो. ह्या वेळेस घरी आल्यावर ४ वर्षानंतर, मी माझ्या बाबांसोबत ४ महिने घालवू शकलो. त्यांच्या शेवटच्या क्षणांचा सोबती झालो, लांब राहून आपण आपल्या वडिलांसाठी काहीच केले नाही ह्या आयुष्यभराच्या अपराधीपणाच्या भावनेतुन मला बाबांनी दूर ठेवले. जेव्हा जॉइनिंगची तारीख मिळाली तेव्हा ते पहायला माझे बाबा माझ्यासोबत नव्हते. बाबा गेले आणि मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. म्हणतातना, “सुखं-दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत” तेच ह्या क्षणी अनुभवत होतो. त्या क्षणापासून मी देवबाबांना माझे बाबा समजून त्यांच्याशी हितगुज करायला लागलो, त्यांच्याजवळ मन मोकळं करायला लागलो. माझे बाबा हयात असेपर्यंत माझी नोकरीतील प्रगती, माझं प्रमोशन, स्वतःच्या बळावर घेतलेली गाडी, घर त्यांना दाखविण्याची संधी मला मिळालीच नाही. त्यामुळे मी बऱ्याचदा हा विचार करतो की माझी जी काही प्रगती होतेय ती सर्व देवबाबांच्या आशीर्वादानेच आहे आणि तेच हे सगळं माझ्या बाबांपर्यंत ते आहेत तिथे पोहोचवतायत आणि त्यांचा आशिर्वाद सुद्धा माझ्या पर्यंत पोहोचवत आहेत.   
देवबाबा, “माझे गुरु आणि माझे बाबा” दोन्ही आहेत.

         मला नुपुरसोबत लग्न करण्याआधी माझी स्वतःची स्वतंत्र ओळख करायची होती त्यासाठी माझी धडपड सुरुच होती. २०१० मध्ये माझं गृहकर्ज मान्य होत नव्हतं, कारण पगार पुरेसा नव्हता. त्यामुळे घर book करूनही, सहा महिने उलटले तरी कर्ज मिळालं नव्हतं. मला खूप ताण आला होता. बूकिंगचे पैसे भरून जर कर्ज मिळाले नाही तर अगोदर भरलेले पैसे सुद्धा फुकट जाणार होते. नकळत खुप ताण यायचा आणि त्यासोबत अफाट चिंता. तेव्हा, बाबांनी मला सांगितलेलं ते वाक्य अजूनही स्मरणात आहे, “चिंता चिता समान हैं” आणि म्हणाले, “तू जितकी जास्त एखाद्या गोष्टीची काळजी करतोस, मला तुझे ते काम करण्यास तितकाच अधिक त्रास होतो, तेव्हा तू निश्चिन्त होऊन ते काम माझ्यावर सोपव जेणेकरून मी ते सहजपणे करून घेईन.” मी काळजी सोडायचा प्रयत्न केला आणि ऑफिस मध्ये मुलांनी हालचाली करून HR बरोबर मीटिंग्स करून काही होऊ शकतं का ते पाहिलं, आणि अखेरीस बाबांनी माझी प्रार्थना ऐकली. HR ने २०११ मध्ये पगारात correction करून दिलं. आता या वाढलेल्या वेतनानुसार मी कर्ज घेण्यास पात्र ठरत होतो. मी लगेच बँकेत सगळी कागदपत्र जमा केली आणि ११/११/२०११ ला माझं गृहकर्ज मान्य झालं आणि कागदोपत्री माझ्या नावाचं हक्कच घर झालं. 

२०१२ मध्ये प्रमोशन झालं आणि ऑफिसमध्ये जे आजतागायत दुसऱ्या कुणाबरोबरही झालं नव्हतं ते माझ्यासोबत झालं कारण लगेचचं २०१३ मध्ये म्हणजे सलग दुसऱ्याच वर्षी मला पुन्हा एकदा प्रमोशन मिळालं आणि मी Assistant Manager झालो.

त्यावर्षी मी गाडीही घेतली, माझं घर आणि गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण करत बाबांनीच माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायला मला मदत केली.

२०१४ मध्ये बाबांनी अचानक लग्न करण्याचा आदेश दिला आणि बाबांचा शब्द “सर आँखोपर” म्हणत मी फक्त हो म्हणत पुढे जायचं ठरवलं आणि मग मदत कशी उभी राहिली ते सगळ्यांनाच माहीत आहे. आमच्या लग्नाची तयारी करायला पुढे सरसावणाऱ्या गुप्ते काकी, नुपुरचा सख्ख्या मामाला यायला उशीर होईल म्हणून नुपुरला माहेरची साडी देणारे गुप्ते काका, माझी बहिण म्हणून करवली होणारी यशश्री आणि लग्नाचा प्रत्येक क्षण टिपणाऱ्या फोटोग्राफरच्या रुपात उभा प्रभास दादा. प्रत्येक प्रसंगात साथ देणारा हा माझा हक्काचा परिवार आम्हाला देवबाबांमुळेच मिळाला. 

  दोन वर्ष उलटली, लग्न होऊन संसाराची गाडी रुळावर येते तोच office मध्ये काही त्रास सुरू झाला. २०१४ पासून 2 वर्ष मी ऑफिस मध्ये एक खास training घेत होतो. त्या प्रशिक्षणासाठी मला जर्मनीला जाण्याची संधी मिळणार होती आणि तेही १ वर्षासाठी. पण जेव्हा माझी जर्मनीला परीक्षेसाठी जाण्याची वेळ आली तेव्हाच माझे जर्मन मुख्य वरिष्ठ श्री. कास्परेक यांनी मला दुसऱ्याच department मध्ये माझी बदली करण्यात आल्याची धक्कादायक बातमी कळवली. मी जीवापाड प्रयत्न करत त्यांना समजवले की मी घेतलेलं प्रशिक्षण आणि मेहनत या बदलीमुळे पूर्णपणे वाया जाईल. पण माझा जितका ठाम निर्धार होता माझा विभाग न बदलण्याचा त्यापेक्षाही ठाम निर्धार होता माझ्या प्रमुख वरिष्ठांचा माझा विभाग बदलण्याचा. अखेरीस २१ मार्च २०१६ मध्ये माझा विभाग बदलला गेला. मी मनाने पार खचून गेलो कारण ह्या नवीन विभागात माझ्यासाठी सगळंच नवीन होतं, शिवाय परत मला नवीन बॉस पुढे स्वतःला नव्याने प्रूव्ह करून दाखवणं आलंच. माझी पुन्हा नव्याने सुरुवात होती. माझ्या आधीचे अनुभव, माझं ते खास प्रशिक्षण काहीही इथे उपयोगी पडणार नव्हते. पण मी बदली टाळु शकलो नाही. पुढे गंमत म्हणजे मी ह्या विभागीय स्थलांतराच्या emotional turmoil मध्ये असताना मे महिन्यात ज्या department मध्ये शिफ्ट झालो तिथेच जून महिन्यात माझ्या आधीच्या department मधील माझे वरिष्ठ श्री. देशपांडे यांची देखील बदली श्री. कास्परेक यांनी माझ्याच विभागात माझे नवीन वरिष्ठ म्हणून केली. Department नविन होते, काम नविन होते पण बॉस मात्र जुनेच, परिचयाचे, ज्यांनी आजवर मला नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन केले आणि माझी प्रगती सुद्धा. नविन काम सुरु झाले आणि बघता बघता एक वर्ष पार पडले आणि २०१७ मध्ये ऑफिस मध्ये बातम्या पसरत होत्या की एक अमुक नावाची firm ऑफिस मध्ये येऊन प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप आणि अनुभव पाहून VW मध्ये कोण राहू शकेल आणि कुणाला कामावरून कमी करता येईल हे ठरवेल. आधी डिपार्टमेंट बदलले मग काम आणि आता हा नविन धक्का त्यात माझं कामही म्हणावं तितकं सुरळीत चालू झाल नव्हतं. मी ह्या विभागात नवीन असल्याने अनुभव पण म्हणावा तितका झाला नव्हता. फक्त एक चांगलं म्हणायचं ते म्हणजे देशपांडे सर आल्यानंतर सहा महिन्यात मला खूप महत्त्वाची कामे देण्यात आली, माझी प्रोफाइल स्ट्रॉंग होत होती. पण आणखी काही बदल झाले तर त्यातून तरुन नेण्याइतका पुरेसा अनुभव माझ्या आताच्या प्रोफाइल मध्ये जमा झाला नव्हता. मला हीच भीती सतत लागून राहिली होती की नोकरी टिकते की नाही? मी तर दिवसरात्र बाबांना माझं काम स्थिर रहावं, टिकावं हीच प्रार्थना करत होतो आणि आश्चर्य म्हणजे बऱ्याच दिवसांनी माझ्या फायद्याची बातमी मिळाली. आमच्या विभागातील खूप स्ट्रॉंग प्रोफाइल असलेल्या मुलाने राजीनामा दिला आणि ते काम माझ्यावर सोपवण्यात आलं आणि माझं प्रोफाइल पुन्हा एकदा स्ट्रॉंग झालं. आदल्या दिवशीपर्यंत नोकरी जाण्याची वेळ येईल की काय असा विचार करत असणारा मी, आज आमच्या विभागातील सगळ्यात महत्त्वाचा झालो. याला तर निव्वळ योगायोग म्हणणे शक्य नाही, हे म्हणजे बाबांनी माझ्यासाठी केलेले सूत्रबद्ध नियोजन म्हटले पाहिजे आणि तेही कोणाचे नुकसान न करता कारण राजीनामा देणाऱ्याला दुसरी चांगली नोकरी लगेचच मिळाली आणि ज्या डिपार्टमेंट मधून मला एक वर्ष अगोदर हलवण्यात आले तिथून एक नसून दोन जणांना नोकरीवरून कमी केल्याची बातमी कानावर आली. 

“डिपार्टमेंट बदलू नका” अशी प्रार्थना बाबांना करणारा मी बाबांचे नियोजन पाहून आवाक झालो आणि आता खूप खुश आहे. या सर्वप्रसंगामुळे माझी दृढ श्रद्धा आहे की बाबा जे आपल्यासाठी करतात त्याचे चांगले परिणाम आपल्याला आज, आत्ता, ताबडतोब मिळतीलच असे नाही पण कालांतराने आपल्याला हेच लक्षात येते की बाबा नेहमीच आपल्या उद्याचा विचार करतात आणि सुंदर, यशस्वी असे भविष्य निर्माण करतात. आपण फक्त त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालायचं, निर्धास्तपणे, सगळा भार त्यांच्यावर सोपवून कारण बाबांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालताना जरी आपण खड्यात पडलो, तरी नंतर कळतं कि त्या रस्त्यावरून येणाऱ्या मोठ्या वादळापासून आपलं रक्षण व्हावं म्हणूनच आपल्याला त्यांनी त्या खड्यात सुरक्षित ठेवलंय. 

  हे व असे अनेक अनुभव रोजच्या दैनंदिन जीवनात सारखेच येतात. नुकताच घडलेला प्रसंग सांगतो. आधी सांगितल्या प्रमाणे माझा गळ्यात असलेला रुद्राक्ष आता साधारणतः १० वर्ष माझ्या सोबत आहे. मी मानसिक आणि भावनिक दृष्ट्या त्यावर खूपच अवलंबून आहे कारण माझ्यासाठी ते एक कम्युनिकेशनचं मिडीयम आहे. हल्ली सारखा हा रुद्राक्ष माझ्या चेन मधून गळून पडायचा ह्या वर्षभरात कमीत कमी ३-४ वेळा हे झाले असेल. असाच एकदा रुद्राक्ष निघाला आणि दुरुस्तीकरता म्हणून रुद्राक्ष, त्यासोबतच्या सोन्याच्या तारी, चैन आणि सोन्याची कॅप मी Ziploc पिशवीत भरून माझ्या जीन्सचा खिशात घालून बाहेर पडलो. दुरुस्तीचे काम झालेच नाही म्हणून आम्ही इतर कामे आटोपली, खाऊ गल्लीत खाल्ले आणि घरी परत आलो. रात्री झोपताना माझ्या लक्षात आले की, रुद्राक्षाची पिशवी गायब आहे. पायाखालची जमीन सरकली. अख्खे घर पालथे घातले पण कुठेच पिशवी सापडेना. खूप उशीर झालेला त्यामुळे तसाच आडवा पडलो. झोप लागणे शक्यच नव्हते. विचारांनी डोके भंडावले होते. शोधू तर कुठे? रस्त्यात पडले असेल तर रुद्राक्षाचे महत्त्व कोणाला काय कळणार? सोने पाहून सहजच कोणीही पिशवी आपल्या खिशात घालेल. मी अक्षरशः मनोमन प्रार्थना करत होतो की नुसता रुद्राक्ष मिळो, बस्स. नुपूर बाबांसमोर बसली होती, ती माझी समजवणूक काढत म्हणाली कि, रुद्राक्षाचा तुझ्या आयुष्यातील कार्यभाग संपला असेल म्हणून सारखेच असे होत आहे. पण मला हे पटत नव्हते. मी तिला म्हंटले की बाबांनी घालू नकोस असे सांगावे मी घालणार नाही. पण माझा रुद्राक्ष असा गहाळ होऊ नये. रात्र सरली आणि दिवस उजाडताच मी पुन्हा पूर्ण घरात नीट शोधले पण पिशवी काही मिळाली नाही. शेवटी माझ्या समाधानासाठी आदल्या दिवशी जाऊन आलेल्या प्रत्येक स्पॉट वर जाऊन चेक करायचे आम्ही ठरवले. सकाळी १० वाजता बाहेर पडलो ‘D-mart’ पासून ते रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात शोधले. रस्त्याच्या कडेला लावलेल्या कचऱ्यात सुद्धा. शेवटी दुपारचे २ वाजले. दमुन गाडीत येऊन बसलो. अक्षरशः रडकुंडीला आलेलो. माझी अवस्था पाहून नुपूर सुद्धा अस्वस्थ झाली. मनोमन तिने बाबांना प्रार्थना करत सांगितलं की, “माझा नवरा त्या रुद्राक्षावर भावनिकरित्या अवलंबून आहे तुम्ही म्हणालात तर तो, तो रुद्राक्ष घालणार नाही पण आता कृपा करून तुम्ही तो रुद्राक्ष मिळवून द्या.” मग काहीतरी लक्षात आले तसे मला म्हणाली की खाऊ गल्लीत बघायचे राहिले आहे. बाबांना कळकळीने प्रार्थना केली आणि गाडी खाऊ गल्लीचा दिशेने फिरवली. खरं सांगायचं तर रुद्राक्ष मिळेल ह्याची आशाच उरली नव्हती कारण फूटपाथ वर एव्हाना साफसफाई कामगारांनी झाडू मारून कचरा पेटवून दिला असेल हेच डोक्यात येत होते तरी आम्ही गेलो मी आणि नुपूर रस्त्याच्या कडेला तेही खरोखरच कचऱ्यात आणि फूटपाथच्या मध्ये पिशवी शोधायला लागलो. फूटपाथ दुपारची वेळ असल्यामुळे रिकामा होता, हातगाड्या नव्हत्या, काही माणसं कडेला कट्ट्याला बसून गप्पा मारत होती आणि आम्हाला बघत होती. तेवढ्यात नुपुरची हाक आली, “सुमुख, हे बघ” फुटपाथवर मधोमध ती ziplock पिशवी जशीच्या तशी होती. त्यातील रुद्राक्ष आणि सोनं सगळं जसच्या तसं होतं. तो रुद्राक्ष माझ्यासाठी सोन्याहून पिवळा आहे हे बाबांनी जाणले, त्यांनी माझे मन जाणले आणि त्यांच्या माझ्यावरील प्रेमापोटी त्यांनी माझा हट्ट पुरवला. एक पूर्ण रात्र आणि एक अर्धा दिवस उजाडलेला पण माझी ३ इंचांची पिशवी रस्त्याच्या मधोमध जैसेथे होती. ह्याला काय म्हणावे? चमत्कार? नाही मी तर ह्याला कृपा म्हणीन…मायारूपी कृपा !!”

मला प्रत्येक वेळी कुठल्याही कामानिमित्त निघताना कानामागून कुणीतरी सांगत असतं, “आज हे अमुक सोबत घेऊन जा, आज काही दुसरं घेऊन जा, वगैरे…” आणि कामाच्या ठिकाणी गेलं की नेमकी तीच गोष्ट त्या कामात उपयोगी पडते. रोजचे रोज नियमित पणे, बाबांच्या मूर्तीसमोर दिवा, धूप लावणं, हा माझा नित्यक्रम झालाय. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही काटेकोरपणे, आणि घालून दिलेल्या साच्याप्रमाणेच झाली पाहिजे, उदाहरणार्थ, ऑफिस मधून आल्यावर कपडे बदलून झाले की हातपाय धुवून पहिले बाबांच्या मूर्तीसमोर दिवा लावणे. 

प्रत्येकला आपल्या डोक्यावर आपल्या बाबांची “guardian” सावली लागते. मला बाबा नाहीत असे मी आता म्हणुच शकत नाही कारण मी माझे बाबा असते तर जसा त्यांच्यासमोर व्यक्त झालो असतो तसाच आता आपल्या देवबाबांसमोर नेहमीच व्यक्त होतो. कारण माझ्याकरता माझ्या घरचा, माझ्या कुटुंबाचा कर्ता पुरुष देवबाबांच आहेत.                                            

– श्री सुमुख सुभाष दिवटे, रावेत, पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *