मुख्य पान

अनंतप्रभु वालावलकर उर्फ देवबाबा

कै. अनंत राजाराम वालावलकर, उर्फ देवबाबा हे महाराष्ट्रातले एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म दि. १३ एप्रिल १९१८ रोजी वांद्रे, मुंबई येथे झाला. त्यांच्या घराण्यात आध्यात्मिक वातावरण आधीपासूनच होते. त्यांचे आजोबा दत्तभक्त, वडील वारकरी सांप्रदायिक विठ्ठलभक्त, तर आई ही साईनाथांचे निस्सीम भक्त आणि श्री साईसतचरीत या अलौकिक ग्रंथाचे लेखक श्री. दाभोळकर यांची कन्या. त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी बालपणात आणि ऐन तारुण्यातही अनेक खडतर उपासना केल्या. त्यांना अनेक सिद्धीही प्राप्त झाल्या, परंतु त्यांनी या सिध्दींचा वापर केवळ लोककल्याणासाठीच केला. यथावकाश त्यांची साधना पूर्णत्वाला जाऊन ते संतपदास पोचले. आयुष्यभर त्यांनी रंजलेल्या-गांजलेल्यांना मार्गदर्शन केले, सन्मार्गाला नेले. त्यासाठी त्यांनी अनेक प्रवचनेही केली, अनेकांना ते तीर्थयात्रांनाही घेऊन गेले. अखेर दि. २५ मे १९९५ रोजी त्यांनी आपला देह ठेवला.

या वेबसाईटचे प्रयोजन

देवबाबांचे भक्त तसे अनेक आहेत. परंतु, या अशा दिव्य आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही फारसे माहिती नाही. कोणत्या-ना-कोणत्या कारणाने, त्यांचा प्रचार आणि प्रसार तसा मर्यादितच राहिला. आजच्या या आधुनिक युगात, इंटरनेटसारखे प्रभावी साधन वापरून त्यांच्या बद्दल अधिकाधिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावी याच एकमेव हेतूने ही वेबसाईट सुरू केली आहे. इथल्या विविध पानांवर असलेली माहिती वाचून व फोटो बघून, देवबाबांबद्दल, त्यांच्या शिकवणीबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल आणि त्यांच्या आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल सर्वांना माहीत व्हावे आणि खऱ्या अर्थाने सर्वांना बाबा समजावेत हीच देवबाबांच्या चरणी प्रार्थना!

देवबाबांचे स्थान

देवबाबा विदेहात गेले असले तरीही त्यांचे कार्य अजूनही सुरू आहे. आपल्या भक्तांना ते अजूनही मार्गदर्शन करतात. किरकटवाडी, पुणे येथे त्यांचे स्थान आहे, जिथे भक्त त्यांच्या दर्शनाचा, कृपाप्रसादाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतात.

बाबांबद्दलची अधिक माहिती आणि स्थानाबद्दलच्या माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पाहावा.

स्थानावरचे उपक्रम

देवबाबांच्या सेवेत, वर्षभरात काही उपक्रम मोठ्या उत्साहाने पार पडतात. भक्तगण मोठ्या भक्तीभावाने, आवडीने आणि हिरिरीने यांत सहभाग घेतात. नियमित आणि वार्षिक उपक्रमांची यादी खालीलप्रमाणे:

  • गुरुवारची आरतीदर गुरुवारी सायंकाळी ६:३० ते ७:३० वा.
  • देवबाबांचा जन्मोत्सववार्षिक – दि. १३ एप्रिल रोजी.
  • गुरु पौर्णिमावार्षिक – तिथीनुसार. यंदाचे वर्षी दि. २९ जुलै २०२६ रोजी.