देवबाबांचा परिचय

शिर्डीचे साईबाबा माहीत नसतील, अशी व्यक्ती सापडणं जरा कठीणच. त्यांच्या असंख्य लीला सर्वश्रुत आहेत. वर्षोनवर्षे शिर्डीला जाणाऱ्या भक्तगणांची संख्या वाढतंच आहे आणि आजही भक्तांना त्यांच्या कृपा-प्रसादाचा लाभ मिळतोच आहे. मौखिक प्रसिद्धी सोबतच, साईबाबांचं कार्य आणि लीला सर्वदूर पसरल्या त्या “श्रीसाईसच्चरित” या सुंदर ग्रंथामार्फत. साईबाबांच्याच आशीर्वादानं आणि अनुमतीनं या ग्रंथाचं लेखन झालं, हे आपल्याला माहीतच आहे. हेमाडपंत, म्हणजेच कै. गोविंद रघुनाथ दाभोळकर यांच्यामार्फत साईबाबांनीच तो लिहून घेतला म्हणा ना! पोथीतल्या एका अध्यायात तसा उल्लेखच आहे. योग्य समयी दाभोळकरांना साईबाबांचा अनुग्रह काय होतो आणि त्यांच्या हातून या पवित्र ग्रंथाची निर्मिती काय होते, सगळं विलक्षणच आहे. पण त्यांना आलेल्या साईंच्या अनुभूती एवढ्यावरच थांबत नाहीत, तर त्यांच्या घरातही पसरतात.

“श्रीसाईसच्चरित” लिहिणारे 
हेमाडपंत

सन १९१५ ला, हेमाडपंतांच्या मुलीचं – कृष्णाबाईंचं लग्न श्री. राजाराम वालावलकर यांच्याशी झालं. लग्नानंतर तिचं नांव झालं सीताबाई. सन १९१८ ला त्या गरोदर होत्या. सहाव्या महिन्यात त्यांना नंदवायू झाला, आणि त्या भ्रमिष्टासारखं वागायला लागल्या. बऱ्याचदा त्या आपल्याच पोटावर जोरजोरात बुक्के मारून घ्यायच्या. त्या पोटातल्या बाळाचा काय होत असेल काय माहीत… बऱ्याच डॉक्टरांना दाखवून झालं, पण सगळ्यांचं एकच मत पडलं – बाळंतीण किंवा बाळ यांपैकी कोणीतरी एकच वाचू शकेल. परिस्थितीचं गांभीर्य ओळखुन, दाभोळकरांनी लगेचच साईबाबांना पत्र लिहिलं आणि संपुर्ण परिस्थिती कळवली. साईंवर त्यांची निस्सीम भक्ती असल्यामुळे, बाबा काय सांगतील तसं करायचं असं ठरलंच होतं. इकडे बाबांना पत्र मिळालं. शामा आणि तात्या कोतेंनी ते वाचून दाखवताच बाबांनी उत्तर दिलं, “काही काळजी करू नये, बाळंतपण सुखरूप होईल.” आणि उदगार काढले “मेरा बेटा आ गया!”

यथावकाश सीताबाईंना प्रसूती वेदना सुरु झाल्या, आणि दि. १३ एप्रिल १९१८ रोजी त्या सुखरूप बाळंत होऊन मुलगा झाला! हेमाडपंत नातवाला बघायला म्हणुन बाळंतिणीच्या खोलीत गेले आणि पाहतात तर काय?! बाळ आपल्या आईपासून लांब फेकलं गेलंय. आई एका बाजूला, आणि बाळ दुसऱ्या कोपऱ्यात, आणि बाळाभोवती प्रकाशाचं वलय पसरलंय. मुलाचा हा प्रकार पाहून आईने तर दूध पाजण्यासही नकार दिला. बाळाला पंधरा दिवस पूर्ण झाल्यावर सर्व कुटुंबियांसोबत दाभोळकर आपल्या नातवाला घेऊन शिर्डीला गेले, आणि त्याला साईंचरणी घातले. बाबांना सर्व हकीकत सांगितली आणि बाळाला आईचे दूध मिळत नसल्याचेही सांगितलं. ते सगळं ऐकुन, साईबाबांनी आपला वरदहस्त बाळाच्या आईच्या मस्तकावर ठेवला. त्याबरोबर तिला शांत झोप लागुन तिचे सगळे वेड पळाले. साईंनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं, त्याला थोपटलं आणि त्याच्या तोंडात आपला हाताचा अंगठा घातला. आणि काय आश्चर्य! त्या अंगठ्यातून दूध पाझरायला लागलं की!! अशाप्रकारे, त्या बाळाला तर जन्मानंतर पंधरा दिवसातच साईबाबांचा अनुग्रह प्राप्त झाला. हे बाळ म्हणजेच श्री. अनंत राजाराम वालावलकर, ज्यांना आता सगळे देवबाबा म्हणुन ओळखतात!

देवबाबा म्हणजेच 
श्री. अनंत रा. वालावलकर

देवबाबा अगदी लहानपणी केळेवाडीत राहत असत. मराठी प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते विल्सन इंग्रजी शाळेत जाऊ लागले. पण पारंपरिक शिक्षणात विशेष रस नसल्यानं बऱ्याचवेळा ते शाळेला बुट्टी मारायचे आणि जवळच असलेल्या कांदेवाडीतल्या अक्कलकोट स्वामींच्या मठात जाऊन बसायचे. किंवा, शाळेत जाऊन हजेरी लावायचे आणि लगेचच बाबुलनाथला जायचे आणि तिथल्या टेकडीच्या पायथ्याशी योगक्रिया करायचे. शाळा सुटायच्यावेळी मात्र ते शाळेतल्या मुलांची वाट बघत थांबायचे. मुलं आली की त्यांच्यात मिसळुन घरी जायचे. त्यामुळं घरी वाटायचं की बाळ शाळेत नीट शिकतो आहे. परीक्षा जवळ आली की फक्त उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास करायचे, ज्यामुळे ते नापास कधी झाले नाहीत. त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पुर्ण केलं. हळुहळू त्यांचं मन शालेय शिक्षणातून उडालं आणि ते पूर्णपणे अध्यात्मिक मार्गाकडे वळले, त्यात रमू लागले.

देवबाबांनी निरनिराळ्या प्रकारच्या साधना केल्या. प्रभादेवीच्या मंदिरात जाऊन काही काळ श्री सिद्धिविनायकाची सेवा केली, श्री गुरुचरित्राची हजारांवर पारायणं केली, दिवसेंदिवस मौन आणि उपोषण व्रतही केले. या सगळ्यांत त्यांना वेळोवेळी अनेक अनुभव आले. दत्त महाराज, अक्कलकोटचे स्वामी, साईबाबांचे दृष्टांत झाले आणि आशीर्वादही मिळाले. जसजसा लोकांना त्यांच्या अध्यात्मिक शक्तींचा आणि अधिकाराचा अनुभव यायला लागला, तसतसे लोक त्यांच्याकडे सांसारिक, अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी यायला लागले. देवबाबांच्या मार्गदर्शनाने खरोखरच त्यांचे प्रश्न सुटायला लागले, आणि लोकांची त्यांच्यावर दृढ श्रद्धा बसली. ठरावीक काळापर्यंतच्या देवबाबांच्या लीला आणि अनुभव, त्यांच्यावर लिहिलेल्या “जीवनगंगा” या पोथीत ग्रथित आहेत. त्यातील काही निवडक कथा आणि त्याव्यतिरिक्तही आलेले अनुभव आपण या वेबसाईटवर वाचणारच आहोत.

देवबाबांचं व्यक्तिमत्व अत्यंत तेज:पुंज असं होतं. भरपूर उंची, कर्पूरगौर वर्ण, तेजस्वी भेदक नजर, सरळ नाक, उंच आणि भव्य अशी कपाळपट्टी, भक्कम पावलं, पाय उचलून टाकतांना आणि भराभर चालतांना शरीराची एका लयीत होणारी हालचाल, उंच वृषभस्कन्द, उन्नत छाती, ताठ मान, करारी वाटावी अशी मुद्रा असं देवबाबांचं थोडक्यात वर्णन करता येईल. एकदा पाहिल्यावर पुनः पुन्हा पहाताच बसावे अशी भुरळ घालणारं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. स्वच्छ पांढरी, पंजाबी पद्धतीनं नेसलेली लुंगी, फिकट रंगाचा झब्बा आणि खांद्यावर झोळी असा त्यांचा नेहेमीचा पोशाख असायचा. चालणं झपाझप आणि नाकासमोर, हालचाली चपळ, आवाज धीरगंभीर आणि धारदार असं एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पहिल्या दृष्टीभेटीतच साधकाचं सारं आयुष्य बदलून जायचं. संसारातल्या विविध तापांतून, आयुष्यातल्या अवघड वळणांतून आणि स्थित्यंतरांतून सहीसलामत पार नेण्याची आश्वासकता त्या नजरभेटीत असे. अडचणीच्या वेळी किंवा उद्विग्न मन:स्थितीत त्यांच्याजवळ नुसतं बसलं तरी मनाला एक अपार शांतता वाटायची. अडचणी यथाकाळ दूर व्हायच्या किंवा त्या सोसायला मानसिक बळ मिळायचं. विलक्षण अशा ओढीनं त्यांना पुनःपुन्हा भेटावसं वाटायचं.

देवबाबांचं तेज:पुंज रूप

दि. १४ मे १९५२ रोजी देवबाबांचा विवाह किशोरी माईंशी झाला. अंबरनाथला, देवबाबांच्या राहत्या घरीच हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणानं, होम-हवन न करता पार पडला. माया-ब्रम्ह जोडी शोभली. हा विवाह कसा जुळला याची पण एक कथा आहे, पण आपण ती नंतर कधीतरी बघु. दि. १ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. आयुष्यभर माईंनी देवबाबांची सेवा केली आणि आपले संबंध आयुष्य त्यांच्या सान्निध्यात, त्यांची देखभाल करण्यात व्यतीत केलं. देवबाबांकडं येणाऱ्या साधकांची त्या आपुलकीनं चौकशी करत, त्यांच्याकडं जातीनं लक्ष देत असत, त्यांना हवं-नको ते बघत असत. देवबाबा थोडे रागीट स्वभावाचे होते. त्यांना कधी आणि कशामुळं राग येईल हे सांगता येणं कठीण होतं. अशावेळी, देवबाबांचा राग-रंग बघून माई साधकांना सांभाळून घेत असत. देवबाबांनी त्यांच्याकडूनही निरनिराळ्या साधना करून घेतल्या, पण माईंनी कोणालाही त्याबद्दल थांगपत्ता लागू दिला नाही. परमार्थात फार मोठा अधिकार असतांनाही त्या देवबाबांच्या मागं नेहेमी त्यांच्या सावलीसारख्या राहिल्या.

साधारण सप्टेंबर १९९० पासुन प्रकृती अस्वास्थ्यामुळं देवबाबा आणि किशोरी माई मालाडला त्यांच्या चिरंजीवांकडे – डॉ. भानुदास यांच्याकडं राहायला गेले. काही आजारपणानंतर किशोरी माई १३ जून १९९१ रोजी स्वर्गवासी झाल्या. त्यांच्या निधनानंतर देवबाबा एकाकी पडले. त्यांचा अतूट असा, नित्यसेवेत असणारा जीवनसाथी पुढे निघून गेला होता. त्या गेल्यावर बाबा बराचवेळ एकांतवासात घालवू लागले, अखंड ध्यानस्थ अनुसंधानात राहू लागले. त्यांनी बोलणं सोडलं, शारीरिक अशक्तपणाही वाढायला लागला होता. शेवटी, दि. २५ मे १९९५ रोजी पहाटे ५:३० वा त्यांनी देह ठेवला… आपला मार्गदर्शक तारा आपल्यातून निघून गेल्याच्या दुखःडोहात त्यांचे सगळे अनुयायी बुडाले… सगळी सृष्टी त्यांना भकास वाटायला लागली. देवबाबांच्याच इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचे अंतिमसंस्कार त्याच दिवशी दुपारी करण्यात आले. अनंत प्रभू अनंतात विलीन झाले…

पण, देवबाबा अनंतात विलीन झाले, असं तरी कसं म्हणु?! त्यांचं नांवच “अनंत” आहे – अंत नसणारे! आजही त्यांच्या सच्च्या भक्ताला, अनुयायाला ते सोबत असल्याची जाणीव पदोपदी मिळते. विदेहात असले म्हणून काय झालं? आजही ते आपल्या भक्तांना साधनेतून, जाणिवांच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन करत आहेत! “बाबा आहेत”, “बाबा मार्गदर्शन करतात” हे सांगणारे बरेच जण तुम्हाला आजही सापडतील. वेळप्रसंगी येणाऱ्या चाफ्याच्या, चंदनाच्या वासातुन “मी आहे तुझ्यासोबत” ही जाणीव, नव्हे ग्वाहीच ते देतात. त्यांच्याप्रती तळमळ ठेवुन, श्रद्धापूर्वक साधना करणाऱ्यांना त्यांचा प्रेमळ सहवास आजही लाभत असेल.

अशा या परम पावन, परम दयाळु, अध्यात्मिक परमाधिकार प्राप्त, परमात्मास्वरूप व्यक्तिमत्वाची ओळख तुम्हाला व्हावी… त्यांच्या कार्याचा, लीलांचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा… आधीच ओळखत असाल तर त्यांच्या स्मृतीनं पराकोटीच्या कृतज्ञतेनं तुम्हाला भरून यावं… या आणि केवळ याच भावनेनं हा खटाटोप चालु केलाय. देवबाबांचे आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा या उपक्रमाला लाभो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!