बाबांनी आधीच केले सतर्क

|| श्री ||

माझे अनुभव म्हणजे देवबाबांचे आपल्याकडे कसं लक्ष असतं आणि योग्यवेळी ते आपल्याला हि बाब कशी दाखवून देतात याची उदाहरणं

प्रसंग पहिला: बाळासंबंधी संकेत 

मी आणि माझी पत्नी देवबाबांचा जप आणि ध्यान करत बसलो होतो. ध्यान करताना माझ्या मनात अचानक बाळाची प्रतिमा डोकावली. वाटलं आपण एका तान्हुल्या बाळाला दोन्ही हातात धरलं आहे. एखाददोन मिनिटं हि भावना राहिली असेल. मग माझं ध्यान उरकलं

माझ्या पाठोपाठ पत्नीचही ध्यान आटोपलं, आणि ती एकदम उत्साहात म्हणाली, ” अरे प्रभास, मला लहान बाळासारखं दिसलं रे ध्यान करताना! मी उडालोच! “अरे मलाही तसंच दिसलं!”

एकाच वेळी देवबाबांचा जप आणि ध्यान करताना आम्हा दोघांच्याही मनात एकच विचार उमटावा? असं का? आम्हा दोघांनाही हा देवबाबांनी दिलेला संकेत वाटला. असं वाटलं कि देवबाबा सांगत आहेत, “आता बाळ होऊ द्यायची वेळ आली आहे!”

प्रसंग दुसरा: नोकरीसंबंधी संकेत 

बऱ्याचदा येतो त्याप्रमाणे मी गुरुवारच्या आरतीसाठी आलो होतो. नेहमीप्रमाणे जप झाला, आरती झाली, गजर झाला. देवबाबांच्या फोटोला आणि मूर्तीला नमस्कार करून प्रसाद घेत असताना मला विचारण्यात आलं, “तुझ्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का?” एकतर मला असं काहीच ज्ञात नव्हतं, आणि दुसरं म्हणजे अशा थेट प्रश्नाने मी जरा भांबावून गेलो.”, “नाही, काही प्रॉब्लेम नाही, का?” मी प्रतिप्रश्न केला. “ठाऊक नाही, पण तुला असं विचारावंसं वाटलं म्हणून विचारलं.” समोरून उत्तर आलं. “ठीक आहेम्हणून मी निघालो, पण डोक्यात हे कोडं घेऊनच.

जेमतेम २-३ आठवडे झाले असतील यानंतर आणि ऑफिसमध्ये कळलं कि आमची कंपनी पुणे ऑफिस बंद करते आहे. नुसतंच पुणे ऑफिस नाही तर भारतातील सगळीच कामं बंद करते आहे. हि बातमी ऐकली आणि `तो` प्रश्न मला का विचारला गेला याचं उत्तर सापडलं. देवबाबांना या येऊ घातलेल्या प्रसंगाची माहिती आधीच होती आणि त्यांनीच `तो` प्रश्न विचारण्याची प्रेरणा दिली तर!

झालं… घरात एक तर ६ महिन्यांचं बाळ. मी तर कायमच ह्याच कंपनीत राहण्याच्या विचारात आणि आता समोर परत नोकरीची शोधा-शोध वाढून ठेवलेली. मी देवबाबांना मनापासून प्रार्थना केली, “तुम्ही सावध केलंत, आता तुम्हीच यातून तारून न्या.” ५ कंपन्यांकडे इंटरव्हू देऊन झाले, एका स्टार्ट-अप कडून तर थेट जॉईन होण्याची ऑफर आलेली. २० मार्च २०१५ हा आमचा या कंपनी मधला शेवटचा दिवस होती, आणि माझी इच्छा होती कि त्या दिवशी किमान ३ तरी ऑफर माझ्या हातात असाव्यात. आणि देवबाबांच्या कृपेने खरोखर तसाच प्रसंग होता! त्या दिवशी माझ्या हातात एकूण ४ कंपन्यांच्या ऑफर होत्या!! दिनांक १३ एप्रिल २०१५ ला देवबाबांचा उत्सव साजरा करून, १५ एप्रिल २०१५ ला मी नवीन कंपनीत रुजू झालो. आता निवृत्त होईपर्यंत याच कंपनीत ठेवावं हीच देवबाबांच्या चरणी प्रार्थना!

हे दोन्ही प्रसंग (आणि इतर असंख्य) माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहेत. जेव्हा – जेव्हा मला ते आठवतात, तेव्हा – तेव्हा माझ्या मनात कृतज्ञता दाटून येते आणि डोळे पाणावतात. त्यांचे हे ऋण मी आजीवन विसरणार नाही.

देवबाबा, तुमची कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवर अशीच राहो हि विनंती.

– प्रभास गुप्ते, कोथरूड, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *