|| ॐ श्री साई अनंत ||
बाबांबद्दल काही अनुभव कथन लिहिण्याच्या निमित्ताने मी माझा खूप महत्वाचा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तरीही यात काही चूकभूल झाली तर यातील माणिकमोती बाबांचा प्रसाद समजावा आणि फोलफट माझी समजावी. जीवनात सर्वात प्रभावी परिणामकारक अनुभव आपण आपल्या बिकट काळात अनुभवतो. बाबांचा आणि माझा तसा काही फार जुना परिचय नाही, साधारण २०१६ हे वर्ष माझ्या जीवनात बाबांच्या आगमनाचे वर्ष. जीवशास्त्र विषयात पदविका पूर्ण करताना माझी मानवी मन आणि वर्तणूक यामध्ये असलेली आवड अगदी पराकोटीला येऊन ठेपली. वर्गात ऐकू येणारे विज्ञान संशोधन मला जितके प्रभावित करत होते तितकेच अध्यात्मही. अध्यात्मिक प्रगती व्हावी याची सतत ओढ लागून राहिली होती. दिवस मागून दिवस जात असताना बाबा माझ्या जीवनात आले आणि स्थिरावले. काय घडले हे मी खूप विस्तारित करून नाही सांगू शकत पण एवढंच सांगू इच्छितो कि जेव्हा वाटत होते कि सर्व काही हातातून निसटून जातेय तेव्हा फक्त बाबांमुळेच आयुष्य सावरलं. आयुष्याला पुन्हा अर्थ आला.
तिची ओळख तशी जुनी, आम्ही M.Sc. ला असताना पहिल्यांदा भेटलो. आम्ही एकाच ग्रुप मध्ये होतो. खूप छान मैत्री होतीच. पण NET च्या परिक्षेनिमित्त पुण्यात आलो तेव्हा खूप जास्त परिचय झाला. आणि लग्न करायचं ठरवलं. पण काही कारणांनी मधल्या काळात आमच्यात खूप दुरावा निर्माण झाला. ती दूर गेली. पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो. पण मार्ग मिळत नव्हता. तिच्यामुळेच मी बाबांना भेटलो होतो. मग मी रोज आर्ततेने बाबांना सांगायचो, “बाबा, मला पूर्ण विश्वास आहे कि जी मला तुमच्या इथपर्यंत घेऊन आलीय, ती माझ्या आयुष्यातून दूर जाणार नाही, तुम्ही जाऊच नाही देणार!! बाबा आशीर्वाद द्या कि माझं प्रेम जर खरं असेल तर तुम्हीच तिला पुन्हा माझ्या आयुष्यात आणाल. तिच्याच सोबतीने मी आणखी पुढे जाऊ शकेन, भौतिक आणि अध्यात्मिक, दोन्ही मार्गात माझी प्रगती होईल. कारण आमचे विचार, मार्ग एक आहेत, हेच विचार सतत माझ्या मनात येत असत. हे नातं खूप दृढ होउ दे आणि तुमच्या आशीर्वादाने ती माझ्या आयुष्यात पुन्हा येउ दे. हि प्रार्थना मी बाबांना करीत राही. दिवस उगवत होता आणि मावळत होता, रोज बाबांचं अष्टक वाचत होतो. खुप अस्वस्थ असे मी, तेव्हा सतत डोळ्यासमोर तुमचा चेहरा आणि तोंडात सतत तुमचं नाव येत असे. का आणि कसं माहिती नाही परंतु एवढं खरं देव आपल्याला नक्कीच मदत करतो पण तेव्हाच जेव्हा आपण आपला सगळा भार त्यावर सोपवून निश्चिन्त रहातो. ट्रेन मधून प्रवास करताना रुळांच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या हिरव्यागार गवतात बाबांची भेदक आणि पावन नजर मला सतत दिसायची. मूर्तिपूजा एक परिपूर्ण शास्त्र आहे असे वेद सांगतात. संस्कृत ग्रंथात वर्णिलेला कीटक-भ्रमर न्यास अर्थात ज्या प्रमाणे कीटक (सुरवंट) कोशात असताना फुलपाखरांच्या अवस्थेचे ध्यान करीत शेवटी फुलपाखरात परावर्तित होते, तसाच मला सतत बाबांचा ध्यास लागल्याने सर्वत्र बाबा दिसत होते. एखादी जिवंत व्यक्ती जशी आपणास जवळ दिसते, आपण तिला अनुभवू शकतो त्याही पेक्षा जास्त जवळून मी बाबांना पहात होतो, अनुभवत होतो. गेल्यावर्षी बाबांचा जन्मोत्सव सोहळा मी पाहिला, तेव्हा अनुभव कथन ऐकण्याची इच्छा होती, पण वेळेच्या अभावी ती पूर्ण झाली नाही. म्हणून कि काय बाबांनी मला त्यांचा माझ्याबरोबर आलेला अनुभव तुमच्या सोबत share करण्याची संधी देऊन माझी ती इच्छा पण पूर्ण केली. समाधी बद्दल वाचले होते कि म्हणे शरीरातली दारं त्याची कृपा असेल तर क्षणात उघडतात. तेव्हा त्या माझ्या अस्वस्थ असण्याच्या काळात मला काय होतय कळत नव्हतं, सतत शरीरात कंपायमान आंदोलनं होत असत. पाठीचा कणा इतका तापून निघे कि वाटे तो मेणासारखा वितळुन जाईल. परंतु बाबांचं अष्टक वाचलं कि एक अनुपम शांतता लाभे आणि विलक्षण आनंद होई.
प्रत्येक गोष्ट, प्रसंग शब्दबद्ध करणं कठीण आहे, पण एवढं मात्र खरं कि बाबांनी माझा विश्वास सार्थ केला. त्यांनी माझं प्रेम मला पुन्हा मिळवून दिलं.
बाबांनी इथपर्यंत सगळ्या ठिकाणी मला साथ दिलीय, यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक क्षणात ते आम्हा दोघांबरोबर उभे असतील आणि सतत मार्गदर्शन करतीलच.
आरती करितो देवबाबा आम्हा तू तारी, बाबा तुमच्या कार्यात साधक होण्याची शक्ती आणि समज आम्हाला द्या.
– प्रदिप नामदेव चोगले, मुंबई