|| ॐ श्री साई अनंत ||
प. पु. देवबाबांचे प्रथम दर्शन, अर्थात फोटोतुनच साधारण २५-२६ वर्षांपूर्वी घडले. माझ्या आतेबहीणीच्या घरी ठाणे येथे गेलो होतो. त्यांच्या घरी देवखोलीत प. पु. बाबांचा मोठा फोटो लावलेला होता. उत्सुकतेने विचारणा केल्यावर प. पु. बाबांबद्दल माहिती कळली. आतेबहीणीचे यजमान श्री. चंद्रकांत देशपांडे बाबांचे निस्सीम भक्त. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना प. पु. बाबांचा निकट सहवास लाभला होता. त्यावेळी मला अध्यात्मिक विषयात जास्त गोडी नव्हती. भौतिक विषयांमध्ये गुंतून पडायचा स्वभाव होता. त्यामुळे प. पु. बाबांची मिळालेली माहिती काळानुरुप पुसट होत गेली. वास्तविक माझ्या अंदाजाने त्यावेळी प. पु. बाबांचे अवतारकार्य सुरु होते. पण माझ्या नशिबात बाबांचे प्रत्यक्ष दर्शन नव्हते.
त्यानंतर सन २०१०-११ च्या दरम्यान माझी पत्नी सौ. संगीता, सौ किर्तीताईंकडे केसांच्या ट्रीटमेंट करिता जात होती. तिच्याकडून सौ. किर्तीताईंकडे असलेल्या प. पु. बाबांच्या स्थानाबद्दल आणि प. पु. बाबांबद्दल कळायला लागले. एक/दोन वेळा गुरुवारच्या आरतीसाठी स्थानावर आलो. १३ एप्रिल २०११ चा पुणे स्थानावरील पहिला जन्मोत्सव अनुभवला आणि त्यानंतर प. पु. बाबांकडे मी केव्हा आणि कसा ओढला गेलो हे माझे मलाच समजले नाही.
प. पु. बाबांचे जवळ जाण्यापूर्वी मी अगणित व अक्षम्य अशा चुका केल्या होत्या. माझ्या अशा चुकीच्या वागण्याची झळ माझ्या कुटुंबियांना बसत होती. मला मात्र मी काही चुकीचा वागतोय ह्याची जाणीवच नसायची. उलट मी केलेल्या चुकांना इतर कोणालातरी किंवा कशालातरी जबाबदार ठरवायचो. त्यामुळे माझे कौटुंबिक जीवन कडेलोटाकडे ढकलले जात होते. प. पु. बाबांमुळे मला हळूहळू माझ्या चुकांची जाणीव व्हायला लागली. स्वतःमध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करायला लागलो. प. पु. बाबांमुळे माझे कौटुंबिक जीवन उध्वस्त होण्यापासून वाचले.
२०१३ साली, आळंदी ते पंढरपूर, आषाढी वारी करायचे मनात होते. सुरुवातीला प. पु. बाबांनी, “मी इथे विठ्ठल रूपात दर्शन द्यायला हजर असताना हा कुठला उपदव्याप करतोयस?” असेही म्हटले. पण नंतर परवानगी देऊन माझा हट्ट पुरवला. मी दिंडीतील ज्या ग्रुप बरोबर वारी करत होतो, त्या ग्रुप मधील काही जण १०-१२ वर्षे वारी करत होते. त्यांच्या अनुभवानुसार साधारण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर उन्हाचा खूपच त्रास होतो. पण त्यावर्षी संपूर्ण वारी होईपर्यंत ढगांचे आच्छादन असे मिळत होते कि उन्हाचा काहीच त्रास जाणवला नाही. तसेच पंढरपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटेच पांडुरंगाचे मुख दर्शन घेऊन परतण्याची त्या ग्रुपची प्रथा आहे, त्यांच्या अनुभवानुसार पहाटेसुद्धा ३ ते ४ तास रांगेत उभे राहावे लागते. पण त्यावर्षी फक्त अर्ध्या तासात आम्हाला मुखदर्शन झाले. ग्रुप मधील लोकांच्या म्हणण्यानुसार त्यावर्षी वारी फारच सुखाची झाली. माझी मात्र खात्री होती कि हि केवळ आणि केवळ प. पु. बाबांनीच कृपा होती.
ह्या वारीदरम्यानच एक विलक्षण अनुभव आला. काही काही ठिकाणी आम्ही दिंडीमध्ये मुक्काम न करता कोणाच्यातरी नातेवाईकांचे घरी मुक्काम करत असू. अशाच एका मुक्कामाच्या गावी दुपारी एक-दीड कि.मी. अंतरावरील नदीवर अंघोळीला गेलो. अंघोळीच्या दरम्यान मी नेहमीच्या सवयीने चूळ फेकली आणि क्षणात लक्षात आले कि मी चूळ फेकली त्या ठिकाणी खडकात ६ ते ७ शेंदूर लावलेले उंचवटे होते. मी मनातून घाबरलो. कारण पाणवठ्याजवळच्या अशाच एका ठिकाणी चूळ फेकल्याचे परिणाम माझ्या वडिलांना उर्वरित आयुष्यात जवळ-जवळ २५ ते २६ वर्ष भोगावे लागले होते. ह्या विचारातच मी सहकाऱ्यांसोबत परतत असताना एक कुत्रे सतत आमच्या बरोबरीने चालत होते. माझ्या मनात एकदम विचार आला, कि माझ्याकडून चुकून नदीकिनारी दुखावल्या गेलेल्या शक्तींपासून संरक्षण देण्यासाठी प.पु. बाबांनीच ह्या श्वानांची योजना केली आहे. (प. पु. बाबांचाही एक आवडता श्वान होता). माझ्या ह्या विचारांना पुढच्याच क्षणी पुष्टी मिळाली. पाठीमागून चालत आलेल्या दोन गावकऱ्यांचा संवाद कानावर आला. एकजण दुसऱ्याला सांगत होता कि, “हे कुत्रे गावात नवीनच दिसते आहे, आणि आज सकाळपर्यंत ह्याला गावात पहिले नव्हते”. मी मनातल्या मनात प. पु. बाबांना नमस्कार केला व आभार मानले.
मला अजून एक आठवते कि, मी आतापर्यंत बऱ्याच देवस्थानात गेलेलो आहे. नमस्कार करताना माझ्या मनात कोणतीही मागणी किंवा इच्छा त्या देवतांकडे व्यक्त होत नाही. पण प. पु. बाबांकडे मात्र मी नेहमीच काहींना काही मागणी करत असतो आणि प. पु. बाबासुद्धा माझी छोट्यातली छोटी मागणीसुद्धा पुरवतात.
माझी अशी श्रद्धा आहे कि ह्या जन्मात व जन्म-जन्मांतरी मला जे काही सुख, आनंद मिळाले ते सर्व प. पु. बाबांच्या कृपेनेच मिळाले आहे आणि त्यासाठी मी बाबांचा मनापासून ऋणी आहे.
प. पु. बाबांनी मला त्यांच्या चरणांपासून कधीही दूर जाऊ देऊ नये, हि बाबांच्या चरणी प्रार्थना.
– श्री. मिलिंद गुप्ते, कोथरूड, पुणे