|| ॐ श्री साई अनंत ||
माझं नाव दिपाली विठ्ठल भादवणकर. सुरुवातीपासूनच मी अत्यंत भित्री, थोडी बुजरी, थोडी नकारात्मक आणि अजिबात आत्मविश्वास नसलेली मुलगी होते. बाबांचं माझ्या आयुष्यात येणं हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारच ठरलं.
जून २०१४ ची गोष्ट आहे. मी नैराश्याच्या अगदी खोल गर्तेत पोहोचले होते. कारणही तसंच होतं. दोन वर्षापासून एकाच गोष्टीसाठी अविरत प्रयत्न चालू होता माझा. काही केल्या ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष सूटतच नव्हत. मुळातच मी फार मेहनती आहे. कधीच नापास होण्याची गोष्ट सोडा पण साधं काठावर पास झाल्याचं सुद्धा माहित नव्हतं. रिझल्ट नेहेमीच बऱ्यापैकी असायचा माझा आणि घरची परिस्थिती हि अशी नव्हती कि ते सतत मला एकाच परीक्षेला बसू देतील. कारण काही केल्या कळतच नव्हतं. बऱ्याच जणांना विचारून देखील झालं पण परिणाम शुन्य.
८ जून २०१४ ला एका फॅमिली function मध्ये सुरेखा ताई (माझी मावस बहीण) हिने माझी परिस्थिती पाहून मला बाबांचा फोटो दिला. ती म्हणाली फक्त ठेव तुझ्याजवळ आणि सांग त्यांना तुझी सर्व गोष्ट. मी तो फोटो घेतला. सर्वात प्रथम जर कोणती गोष्ट कनेक्ट झाली असेल तर ती म्हणजे बाबांचे डोळे!! अप्रतिम बोलके डोळे जणू काही मला सांगतच होते कि बाळा मी आहे तुझा. आता सर्व छानच होणार. एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मला मिळाली होती बाबांच्या स्वरूपात. दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी कॉलेजला गेले तेव्हा मला कळलं कि मी दुसऱ्या विषयातून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकते. मी लगेच जीवशास्त्र विषयात ऍडमिशन घेतली आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्या वर्षी संपूर्ण कॉलेज मधून माझा पाहिला क्रमांक आला होता. नुसतं माझं ग्रॅज्युएशन नाही झालं तर मला खूप चांगले मार्क्स मिळून मी पुढच्या वाटचालीस लागले.
आता मी निर्णय घेतला होता कि मी इथे थांबणार नाही. मी आणखीन पुढे जाणार. आणखीन शिकणार. घरची परिस्थिती चांगली नसताना सुद्धा सर्व गोष्ट अगदी सहज घडत होत्या. बाबा माझ्या सोबत आहेत याची जाणीव मला प्रत्येक पावलावर होत होती. मी फक्त फोटोत त्यांना पाहायचे त्यांच्याशी बोलायचे आणि ते सुद्धा मला प्रतिसाद द्यायचे.
आणखीन एक खूप छान अनुभव सांगायचंय तो म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावर मला आता पोस्ट ग्रॅज्युएशन साठी नव्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं. तिथे आधी interview आणि मग ऍडमिशन अशी पद्धत होती. ऍडमिशन च्या दिवशी माझ्या अगदी एक क्रमांक आधीच ऍडमिशन प्रक्रिया थांबली, त्यांनी सांगितलं आता जागा शिल्लक नाहीत. मला केबिन मध्ये घेतलंच गेलं नाही. उलट माझा अपमान करून मला तेथून हकलण्यात आलं. मला फार दुःख झाले. मी बाबाना सांगितलं कि मला इथेच माझं शिक्षण पूर्ण करायचंय आहे. मला त्याशिवाय कुठेच जायचं नाही आणि अगदी घडलंही तसंच. दुसऱ्याच दिवशी मला कॉलेजकडून बोलावणं आल. दोन ऍडमिशन कॅन्सल झाल्या होत्या आणि यावेळी माझा interview देखील नाही झाला. मला अगदी आदरपूर्वक त्यांनी बोलावलं.. ऍडमिशन दिलं. एवढंच नाही तर मला पुन्हा खूप चांगल्या grades ने ती पदवी मिळाली होती.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाबांनी मला अगदी मला साजेसा असाच साथीदार, जोडीदार सुद्धा माझ्या आयुष्यात आणला आहे. खूप गोष्टी आहेत संगण्यासारख्या. प्रत्येक पावलावर बाबांनी मला प्रचिती दिली आहे. मी त्यांच्याशी बोलते, भांडते, रागावते आणि ते सुद्धा मला अगदी स्पेशल वागवतात. ते सुद्धा माझ्यावर रागावतात, मला माफ करतात, माझ्यावर माया करतात. ते आहेत आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते कि त्यांचा आशीर्वाद सतत माझ्या सोबत असतो. ते स्वतः असतात आणि म्हणूनच मी आज ph.D. करण्याचा निर्णय घेतला आहे. मला पूर्ण विश्वास आहे बाबा नक्कीच इथून पुढे सुद्धा तुमची कृपादृष्टी माझ्यावर असणार.
आरती करतो देव बाबा आम्हा तू तारी…
-दिपाली विठ्ठल भादवणकर, सांताक्रूझ, मुंबई