|| श्री साईनाथाय नमः ||
|| श्री स्वामी समर्थ ||
खरंतर काय लिहायचं ते सुचत नाही पण “देवबाबांचे अनुभव सांगितल्याशिवाय रहावत नाही, म्हणून हा छोटासा प्रयत्न…
साधारण २०१३ ची वेळ. माझा मुलगा साहिल (राऊ) बारावी सायन्सला होता आणि त्यावर्षी तो नापास झाला. ती वेळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भयंकर होती. त्यावेळी माझे बाबा (श्री अरुण दोंदे) मला म्हणाले कि किर्तीकडे बाबांचे स्थान आहे तर तू त्याला घेऊन जा दर्शनाला. खरेतर किर्ती माझी मोठी वाहिनी, परंतु तोपर्यंत मला देवबाबांबद्दल जास्त माहिती नव्हती. घरातच बाबांचे स्थान पण मला माहिती नव्हती, किती हे माझे दुर्भाग्य!! पण म्हणतात ना कि वेळ आल्याशिवाय बाबांची भेट होत नाही. त्यावेळी मी आणि माझा मुलगा साहिल खऱ्या अर्थाने देवबाबांच्या दर्शनाला आलो.
बाबांनी त्याला काही गोष्टी करायला सांगितल्या जेणेकरून त्याला पुढील दृष्टीने मदत होईल, परंतु त्या त्याने कटाक्षाने पाळल्या नाहीत आणि तो पुन्हा एकदा बारावी सायन्सला नापास झाला. त्याला त्याच्या निष्काळजीपणे वागण्याचा धडाच मिळाला. मला आता सांगतानाही त्यावेळेची परिस्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. कारण एकदा नाही तर दोनदा त्याला त्या परिस्थितीतून जावं लागलं. त्यामुळे घरात होणारे वाद, भांडणं नको वाटायचे.
त्यानंतर त्याने कोहिनुर मधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश मिळवला. बाबांच्या कृपेने त्याला सहज प्रवेश मिळालाही आणि त्याने “Diploma in Hotel Management” पूर्ण करून इंटर्नशिप करून तो कोर्स पूर्ण केला.
आता तो J. W. Marriott, Rennaissance, पवई, या पंचतारांकित हॉटेल मध्ये Culinary Associate (म्हणजे Chef) म्हणून कार्यरत आहे. देवबाबांच्या आशीर्वादाने त्याला आज permanent job आहे. म्हणूच मी देवबाबांची खूप ऋणी आहे. कारण एकेकाळी अशी परिस्थिती होती कि हा मुलगा पुढे काय करेल? काही करेल पण का नाही? पण देवबाबांनी त्याला योग्य मार्ग दाखवून त्याचे आयुष्यच बदलून टाकले. हा माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव, देवबाबांच्या सांनिध्यातला.
तसेच साहिल hotel Renaissance मध्ये कार्यरत झाल्यापासून त्याला सकाळची शिफ्ट असे. तो साधारण १४ ऑक्टोबर २०१६ ला रुजू झाला. त्याची Activa घेऊन तो साधारण सकाळी ६ वाजता निघे, जाताना बाबांची उदी लावूनच त्याला मी पाठवीत असे. दोन महिने झाले असतील त्याला जॉईन होऊन. १९ डिसेंबर २०१६ ला सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे तो ड्युटी वर जायला निघाला आणि ७ वाजता भांडुप पोलीस स्टेशनमधून फोन आला कि, “तुमच्या मुलाला अपघात झाला आहे”. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मी आणि माझे पती, आम्ही लगेचच भांडुप पोलीस स्टेशनला गेलो. साहिलला सुखरूप पाहिले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. त्याचा खांदा dislocate झाला होता आणि थोडेफार पायाला खरचटले होते. खूप मोठा अपघात टळला होता.
पण नंतर आम्हाला कळले कि भांडुपचा गोदरेज flyover जिथे संपतो तिथे त्याला अपघात झाला, आणि ती जागा बरोबर नाही. तिथे खूप अपघात होतात आणि अशापद्धतीने अपघात झाला कि त्यातून कुणीही वाचत नाही. पण त्याच्यामागे देवबाबांचे आशीर्वाद आणि कपाळावर देवबाबांची उदी होती म्हणून फक्त हातावर निभावले. त्याला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज लागली नाही. २१ दिवस प्लास्टर पण नाही. फक्त बेल्ट लावून आणि फिजिओथेरपी घेऊन तो पूर्ण बरा झाला.
नंतर दोन महिन्यातच तो त्याच्या कामावर permanent झाला. हे सर्व देवबाबांच्या आशीर्वादाने घडत होते.
प्रत्येक महिन्याला त्याच्यामागे काहींना काही अडचणी चालूच असायच्या. प्रत्येक महिन्याच्या १९ तारखेला त्याला काहीतरी अडचण यायचीच. पण प्रत्येक वेळेस देवबाबांनी त्याची स्वतःच्या नातवाप्रमाणे काळजी घेतली आणि त्याला सर्व संकटातून योग्य मार्ग दाखविला आणि अजूनही तेच त्याला योग्य मार्ग दाखवितात.
आम्हाला पण प्रत्येक संकटातून त्यांनीच वेळोवेळी बाहेर काढलंय. मी बाबांची शतशः ऋणी राहीन कारण त्यांनीच माझ्या कुटुंबाला अनेकदा योग्य मार्ग दाखवत संकटातून बाहेर काढलं आणि अजूनही काढतात.
अशीच कृपा आमच्या कुटुंबावर राहू दे अशी मी देवबाबांकडे मनापासून प्रार्थना करते.
– सौ. मेधा शिरीन राजे, वडाळा, मुंबई