बाबांसोबतचे विलक्षण नाते

|| ॐ  श्री साई अनंत ||

आज खरंच खूप महिन्यांनी देवबाबांबद्दल लिहिण्याचा योग, त्यांच्याच कृपेने आला. इतके दिवस खरंच लिहायची खूप इच्छा असून देखील योग येत नव्हता. कदाचित भीती होती कि आपण आपले अनुभव असे लिहू शकू का? याची.

देवबाबा म्हणजे आमचे फक्त आणि फक्त `बाबा`. त्यांचं आणि माझं खरंच तसंच आहे. वडील – मुली सारखं आणि हो, हे त्यांनीच मला सांगितलं आहे. बाबा हे प्रत्येक श्वासात असतात. या वाक्यातच खरंच सगळं सामावलं आहे. हे आयुष्य फक्त बाबांच्या कृपा आणि आशीर्वाद यांच्यामुळे खूप उत्तम असं आहे.

बाबांची आणि माझी पहिली भेट अगदी अनपेक्षित होती. जेव्हा मी लग्न करून पुण्याहून कल्याणला आले आणि बाबा इकडून पुण्याला गेले. गौरवकडून (माझा नवरा) बाबांबद्दल मला कळलं होतं. खरंतर तो मला न सांगताच पहिल्या उत्सवासाठी पुण्याला आला होता आणि नंतर कल्याणला आल्यावर मला अगदी थोडक्यात पण महत्वाची (त्याच्या स्वभावाप्रमाणे) माहिती बाबांबद्दल सांगितली. मला त्याक्षणी खरंच खूप कुतूहलता होती कि नक्की कोण असतील हे? कसे असतील? कारण त्या काही दिवसांमध्ये मी आणि गौरव खरंच कोणत्या तरी अनामिक ओढीने गुरूंचा शोध घेत होतो. कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी गुरूंची कृपा आपल्यावर असल्या शिवाय आपण यशस्वी होऊच शकत नाही, या पक्क्या विचारांचे आम्ही झालो होतो आणि म्हणूनच गौरवने मला जेव्हा त्याची गोष्ट सांगितली कि देवबाबा हेच त्याचे गुरु आहेत आणि त्यांचं नातं हेही जन्मोजन्मीचं आहे, तेव्हा तर मी खूपच अधीर झाले होते त्यांना भेटायला.

अखेर तो दिवस आला जेव्हा मी पहिल्यांदा स्थानावर आले. मला अजूनही तो प्रसंग पूर्ण आठवतो. मी बाबांना नमस्कार केला नाही फक्त त्यांच्याकडे बघत होते. त्याच क्षणी बाबांनी माझं अस्थिर मन शांत केलं आणि मनातील काही प्रश्नांची उत्तर देऊन त्यावर उपाय देखील सांगितले. हे सगळं इतकं अनपेक्षित होतं कि विश्वासच बसत नव्हता कि हे सगळं मनातलं बाबांनी कस ओळखलं? त्या क्षणी मी फक्त रडत होते. 

दुसऱ्याचं भेटीत बाबांनी मला माझं आणि त्यांचं नातं काय होतं आणि आहे हे सांगितलं आणि ते ऐकून मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते कि असे गुरु आज आपल्याला मिळाले आहेत कि ते आपल्या मुलांना स्वतः बोलवून घेतात आणि त्यांच्या सर्व इच्छा, अपेक्षा अगदी हट्ट सुद्धा पूर्ण करतात. खरंच माझा एकूण एक हट्ट बाबांनी पूर्ण केलाय. देव बाबांच्या इच्छेशिवाय कोणी स्थानावर येऊ शकत नाही, याचा मला वेळोवेळी अनुभव आलाय.

जेव्हा आपण चुकतो तेव्हा फक्त बाबांच्या पायावर डोकं ठेवलं कि खूप जास्त रिलॅक्स वाटतं. बाबांनी आम्हाला वेळोवेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसं मी आधी म्हटलं कि श्वासात बाबा आहेत आणि जसं आपण आपला श्वास मोजत नाही तो फक्त असतो आणि त्या चेतनेची जाणिवच आपल्याला जिवंत ठेवते. तसेच अगदी बाबाही आहेत. ती चेतना, ऊर्जा, ते रूप, ती जाणीव हेच या देहाचं कारण आहे.

आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्याच मुळे. माझ्या प्रत्येक यशात, प्रत्येक कामात त्यांचाच आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे आणि ते तसंच अखंड राहो अशी माझी त्यांना प्रार्थना आहे. 

अगदी माझ्या गरोदरपणात देखील बाबांनी खूप आधीच आम्हाला “यशमिर” बद्दल सूचित केलं होत. तसंच गौरवच्या क्लिनिक बद्दलही बाबांनी दिलेल्या आणि करवून घेतलेल्या उपायांमुळे आज त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सुरु आहे. मी अगदी हक्काने बाबांकडे सगळं मागत असते आणि खरंच तेही तितक्याच मायेने ते देत असतात.

माझ्या बरोबर अगदी माझ्या घरच्यांना देखील बाबांचे अनुभव वेळोवेळी आलेले आहेत. बाबा आपल्यासाठी योग्य गोष्टी अगदी योग्य वेळी करत असतात फक्त आपल्यालाही जरा विश्वास आणि संयम ठेवावा लागतो हेही तितकंच खरंय. बाबा आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतात. त्यांच्याशी मी खरंच अगदी काहीही share करू शकते आणि ते देखील ते सगळं अगदी मनापसून स्वीकारतात आणि लगेच प्रत्यय देखील देतात.

देवबाबा असेच सदैव आमच्या पाठीशी रहा. आम्हाला योग्य दिशा द्या आणि अखंड तुमची सेवा आणि आशीर्वाद आम्हाला मिळू द्या.

“निरालस्य सप्रेम सेवा घडावी, अनंत तुझे पायी भक्ती जडावी,

द्यावे तुला नित्य प्रेमेची नाथा, देई मला हा वर रक्ष आता”

 – सौ. क्षितिजा गौरव गुप्ते, कल्याण 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *