|| श्री बाबा ||
मी राहुल चिटणीस, माझा जन्म मुंबईचा परंतु वास्तव्य ठाण्यात होते. कॉलेजचे डिग्री पर्यंतचे शिक्षण माझे ठाण्यातच झाले. किर्ती हि माझी आतेबहीण. तिची आई लता आत्या हि माझ्या वडिलांची सख्खी बहीण. लता आत्या अकाली गेली आणि किर्तीची मोठी बहीण, किर्ती आणि लहान भाऊ निलेश हे आमच्याकडेच राहू लागले होते. साहजिकच आमचे नाते आते – मामे भावंडांचे न राहता सख्ख्या भाऊ बहिणींचे झाले होते. लहानपणापासूनच किर्ती हि माझी लाडकी बहीण होती. पुढे कालांतराने लग्नानंतर तिची नुपूर म्हणजे माझी भाची, माझ्या आणि किर्तीच्या भावबंधनाना मागे सारत माझी फारच लाडकी झाली. ती आमच्याकडे राहण्यास येत असे. किर्तीचा नवरा म्हणजे माझा मेव्हणा मंगेश, मंगेश हा स्वभावाने मोकळा, ढाकळा, गप्पिष्ट अगदी माझ्या स्वभावाशी त्याचा स्वभाव जुळणारा. `सारख्या पिसांचे पक्षी` हे एकत्रच वावरतात, अशा अर्थाचा एक इंग्रजी वाकप्रचार आहे, त्यानुसार आमचा एकत्र वेळ अतिशय खेळीमेळीत आनंदात जात असे. पहावयास गेलो तर आमच्या दोघांच्या वयात दहा ते बारा वर्षांचा फरक, तरीसुद्धा मंगेशच्या मोकळ्या वागण्याने आम्ही समवयस्कर असण्याचेच भासत असे.
किर्ती जेव्हा पुण्यात स्थायिक झाली तेव्हा मी अनेकदा तिच्याकडे येत असे तेव्हा दंगा, मस्ती, टिंगल, मांसाहारी – शाकाहारी विनोदांचा शिडकाव म्हटल्यावर आनंदाला काय तोटा? `आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे` अशीच एकूण परिस्थिती!!
त्यावेळी मी देवबाबांची फोटो फ्रेम किर्तीच्या showcase वर असलेली पहात असे, नंतर काही काळाने हीच फ्रेम तिच्या देवघरात स्थानापन्न झालेली देखील पहिली. मी आपला, किर्ती त्यांना देव मानते म्हणून त्यांना नमस्कार करत असे. माझी स्वतःची अशी काही भाविक भावना नसावयाची. देवबाबांविषयी मला तेव्हा काहीच माहिती नव्हती. इतकेच नव्हे तर हेच देव बाबा पुढे कधी तरी माझ्या आयुष्याचाच एक प्रमुख भाग बनतील, माझ्या कडून इथे परदेशात त्यांची सेवा होईल, असा विचारसुद्धा कधी माझ्या मनाला शिवला नाही. अर्थातच भावी काळातील नॉस्ट्रडॅमस, घटना अगोदर कळणारा मी कुणी नव्हेच.
पण म्हणतात ना कि देवांच्या मनात जे असते तसेच पुढे घडत जाते. २०१६ च्या मार्च महिन्यातील घटना समिधा (माझी पत्नी) मला म्हणाली कि क्रिशला (माझा मुलगा) अठरा दिवसांची शाळेला सुट्टी आहे, तेव्हा आपण भारतात जाऊ या का? तीन व्यक्तींची विमान प्रवासाची तिकिटांची किंमत हि जवळ जवळ १८०० – २००० पौंड पर्यंत जात होती. इतका मोठा खर्च करून फक्त अठरा दिवसांसाठी मुंबईला जाणे मला अत्यंत अव्यावहारिक दृष्टिकोनाचे वाटत होते. मी तसे समिधाला सुचविले सुद्धा होते. परंतु जर स्त्रियांनी एखाद्या गोष्टीसाठी निर्धार केला तर ती गोष्ट सहजासहजी सोडत नाहीत. माझ्या लक्षात आली समिधाची इच्छा. एखाद्या सुज्ञ पतीप्रमाणे मी हो जाऊ या, मी तिकिटे उपलब्ध आहेत का? किंवा कमीत कमी किती पौंडात ती मिळू शकतात हे तपासतो असे सांगून वेळ मारून नेली. प्रत्यक्षात मी फारसा काही रस घेतला नाही. काही दिवसानंतर तिने पुन्हा तोच प्रश्न माझ्याकडे उपस्थित केला, आम्ही शॉपिंग करून घरी परतत होतो. घरी आलो, गाडी पार्क केली. गाडीतूनच वेगवेगळ्या एअर एजन्सीत फोन करून तिकिटांचा अंदाज घेतला. कुठल्याही एअर एजन्सीचे दर १८०० ते २००० पौडांपेक्षा कमी नव्हते. मी समिधाला तसे सांगितले. तिने मला एक फोन नंबर देऊन हा शेवटचा फोन नंबर आहे, जमले तर बघ नाहीतर मुंबईला जाण्याचा विचार सोडून देऊ असे थोड्या नाराजीनेच सांगितले. मी फोन नंबर फिरवला आणि तुम्हाला काय सांगू? ‘आले देवाजीच्या मना…’ समोरून देववाणी व्हावी असा तिकिटांचा दर समोरच्या व्यक्तीने सांगितला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईची इंग्लंडहून परतीच्या तीन तिकिटांची किंमत १२०० पौंड होती. अट इतकीच कि तात्काळ सर्व पैसे भरून तिकीट काढणे. दुसऱ्या दिवशी त्याच तिकिटांचे २००० पौंड पडणार होते. मी तत्क्षणी क्रेडिट कार्ड वापरून तिकिटे बुक केली. एका फटक्यात दोन शिकारी.. पत्नी खुश आणि मला हवा असलेला दर मिळाल्यामुळे मी स्वतःही खुश!!
आम्ही मुंबईस आलो. काही दिवसांनी प्राजक्ता, माझी धाकटी बहीण मला म्हणत होत कि किर्तीच्या घरी पुण्यात देवबाबांचा उत्सव आहे. तुला तिच्याकडे येण्यात रस आहे का? मला आठवले कि किर्तीने माझ्याकडे UK तुन फोन वर बोलताना उल्लेख केला होता तो असा कि, उत्सवाला येण्यासाठी येणा-या वक्तीचीच नुसती इच्छा असून चालत नाही तर देवबाबांची इच्छा असावी लागते. यापूर्वी असा अनुभव काही जणांनी घेतला आहे. मी विचार केला कि बघूया श्रींची काय इच्छा आहे? असेल इच्छा तर होईल प्रत्यक्ष दर्शन!!
आम्ही राजे, चिटणीस कुटुंबीय हे बाबांच्या सोहळ्यासाठी ठाण्याहून निघून किर्तीच्या घरी पोहोचलो. घरात बरीच भाविकांची गर्दी जमली होती. माझ्या पायात, पायाच्या घोट्यापर्यंतचे बूट होते. ते सारखे काढणे घालणे मला त्रासाचे होत होते. किर्तीच्या घरी आलो तेव्हा मी बूट काढले होते. काही कारणास्तव मला किर्तीच्या घराखाली जावयाचे होते. मी बूट घालण्याचा कंटाळा केला. गुप्तेकाकांच्या चपला सामोर दिसल्या त्या तशाच पायांत अडकवून खाली उतरलो. थोड्याच वेळाने परत वर किर्तीकडे जाण्यासाठी जिन्यावर चढणार तोच सगळी मंडळी बाबांची पालखी उचलून जिन्यावरून खाली आले. बाबांच्या पालखीला किर्तीच्या घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर मंदिरात नेऊन आणायचे होते. गुप्ते काकांना मी त्यांच्या चपला दिल्या. वरील मजल्यावर जाऊन बूट घालून पुन्हा परत येऊन पालखीला गाठू किंवा नाही या शंकेने मी बूट न घालताच अनवाणी पालखीचा भोई बनून पालखी बरोबर चालू लागलो. ऊन बरेच झाले होते डांबरी रस्ता चांगलाच तापला होता. पायाला चटके बसत होते. मी पालखी बरोबर चालतच होतो. बाबा जणू माझी परीक्षा घेत होते.
पालखी घेऊन आम्ही परतलो. किर्तीच्या देवघरात एक प्रसन्न आणि भाविक वातावरण होते. दोंदे, सुळे आणि दिवटे कुटुंबीयांनी देवघरात मांडणी केली होती. बाबांच्या मुख्यमूर्ती समोर सात छोट्या बाबांच्या प्रतिकृती मांडून ठेवल्या होत्या. या सातमुर्ती कशासाठी इथे मांडून ठेवल्यात असा सहज प्रश्न भाविकांना पडला होता. किर्तीने त्याचे स्पष्टीकरण दिले, “या सात मूर्तीपैकी सहा मूर्ती या भक्तगणांच्या घरी जाणार आहेत, सातवी मूर्ती हि कुणा भक्ताकडे जाणार हे अजून बाबांनी सांगितले नाही”. आरती सुरु असताना समिधा फोटो काढीत होती. नुपूरने तिला बाबांच्या मूर्तीला वारा घालण्याचे सांगितले. समिधा बाबांच्या मूर्तीला वारा घालू लागली. आरती पूर्ण होईपर्यंत समिधाचे वारा घालणे चालूच होते. आरती संपली. इतक्यात माझी नजर किर्ती व नुपूरकडे गेली. दोघी एकमेकींत काही कुजबुजत होत्या. किर्तीचे डोळे विस्फारले होते. बाबांनी सातवी मूर्ती कुणा भक्ताकडे जावी हे किर्तीच्यापर्यंत पोहोचविले होते. तिने मला जवळ बोलावून विचारले कि बाबांची इच्छा तुझ्याकडे इंग्लंडला यावयाची आहे, तू बाबांना घेऊन जाऊ शकतोस का? या प्रश्नाने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. माझ्या घरी देवाला यावेसे वाटतेय, या कल्पनेनेच मी आनंदविभोर झालो. बाबांच्या उत्सवाला हजर राहण्याची परवानगी मागत होतो तर देवाने दोन डोळ्यांचाच प्रसाद दिला. मी म्हणालो कि, “बाबांना माझ्या घरी येण्याचे त्यांच्या मनात असताना मी त्यांना येऊ नका म्हणायला काय करंटा जन्मलो आहे कि काय? त्यांना मी आनंदाने आणि मनापासून माझ्या घरी नेईन”. समिधाला एक असा प्रश्न पडला होता कि, राहुलच्या नोकरीत त्याला सतत घराबाहेर राहून इंग्लंड देशात सर्वत्र फिरायला लागते. अशावेळी राहुल बाबांची सेवा कशी काय करणार? याचे उत्तर बाबांनीच दिले. राहुलच्या अनुपस्थित त्याची पत्नी समिधा हि बाबांची सेवा करील.
बाबांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही बाबांबरोबर यूकेतील आमच्या घरी आलो. बाबांची यथोचित देव्हाऱ्यात प्रतिष्ठापना केली. माझ्या अनुपस्थीतीत समिधा दर गुरुवारी बाबांची उपासना करीत आहे. आरत्या देखील म्हटल्या जातात. मी बाबांकडे जाण्यापूर्वी डोंबिवलीत खुळे काका या माझ्या गुरूंकडे जात असे. त्यांच्या घरी स्वामी समर्थांची गादि होती. मी स्वामींचा भक्त होतोच. माझी अशी धारणा आहे कि देवबाबांकडे पोहचण्याचा मार्ग मला खुळे काकांकडूनच मिळाला असावा. मी येथे इंग्लंड या देशात स्थायिक होण्यासाठी मला खुळे काका या माझ्या गुरूंनीच प्रेरणा दिली हा माझा विश्वास आहे. घरात गुरुवारी होणाऱ्या देवाच्या आराधनेमुळे क्रिशवर चांगलाच संस्कार होईल याची मला खात्री आहे. मी सुद्धा देवाजवळ सर्वाना सुख समाधान आणि शांती द्या अशीच प्रार्थना नेहमीच करीत असतो.
आज जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या असे लक्षात येते कि बाबा माझ्याघरी येणे हि माझ्या आयुष्यातील अद्भुत अशी घटना आहे. तेव्हा मी किती मूर्खासारखं वागत होतो. तिकिटाचे पैसे भरताना भारतात वास्तव्यास किती दिवस मिळणार याचे गणित लावत बसलो होतो. सर्व भौतिक गोष्टींचा विचार करीत होतो. देवाचा विचार करीत नव्हतो परंतु तोच देव माझा विचार करीत होता. माणसे तर लाकडाच्या, राजा, हत्ती, उंट यांचा बुद्धिबळाचा खेळ नेहमी खेळत असतात, परंतु हा जगनियंता ग्रह, ताऱ्यांना, हत्ती, उंट, घोडे आणि माणसाची प्यादी बनवून नियतीशी बुद्धिबळाचा खेळ खेळत असतो. १३ तारखेस बाबांची सातवी मूर्ती बाबांनी मला देऊन, हेच दाखवून दिले कि, “तेरा साथ हम ना छोडेंगे”
बाबांनी सर्व भक्तांवर असाच लोभ व प्रेम करावे हीच त्यांच्या चरणी माझी नम्र प्रार्थना!!
-राहुल चिटणीस, नॉटिंगहॅम, यू.के.