|| ॐ श्री साई अनंत ||
आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला देवबाबांबद्दल लिहिण्याची संधी मिळतेय त्यासारखे मोठे भाग्य ते काय!! बाबांना वंदन करून त्यांच्याविषयी दोन शब्द लिहिण्याचा मी प्रयत्न करतेय आणि मला आलेले काही अनुभव येथे share करतेय.
सुरुवात कुठून करावी कळत नाहीये, इतकं काही सांगायचं आहे बाबांविषयी. खरंच बाबांमुळे मला एक नवीन जीवन, नवीन आयुष्यच मिळालं आहे. थोडक्यात माझी ओळख करून देते जेणेकरून बाबांनी मला कशी-कशी प्रचिती दिली हे मला सांगता येईल.
मी रमा आमटे, मी एक सायकॉलॉजिस्ट असून २०११ साली माझं M. A. पूर्ण झालं. २ वर्ष मी छोट्या-छोट्या ठिकाणी नोकरी केली. लहानपणापासूनच घरातल्यांचा मी स्वतःच्या पायावर उभं रहावा असा अट्टाहास होता. पण त्यासाठी लागणार पाठिंबा असा नव्हता. मी २ वर्ष छोट्या छोट्या ठिकाणी नोकऱ्या केल्यांनतर माझ्या मैत्रिणीच्या ओळखीने मी तिच्याच येथे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत नोकरीस लागले. मी खूप खुश होते, कारण ती एक नावाजलेली संस्था होती. पण मला माहिती नव्हतं कि मी तिथे जाऊन खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. तिथे काम करत असताना माझी एका मुलीसोबत ओळख झाली, नंतर दिवसेंदिवस ती मैत्री खूप गाढ होत गेली. आम्ही आता दिवसभर एकत्र असायचो. ती मला चांगला पाठिंबा द्यायची. ती आता मला माझ्या बहिणीसारखी होती पण आपल्याला कळत नाही समोरच्याच्या मनात काय असेल? मी नको तेवढी तिच्यात गुंतत होते कारण मला जो पाठिंबा घरात मिळत नव्हता तो तिच्याकडून मिळत होता. मी नेहमी तिच्याच चांगल्याच विचार करत असे. मी माझ्याआधी तिचा विचार करायचे. आम्ही एकमेकींच्या घरी अशा रहात असून कि दोन्ही घरं आमचीच आहेत. तिच्या आई-बाबांनी पण मला मुलगीच मानलं होतं.
एकदा तिच्या चुकीमुळे मी नोकरीच्या ठिकाणी अडकले. मला माझ्या वरिष्ठ बाईंनी पर्याय दिला, “बघ कुणी केलं आम्हाला माहिती आहे, पण तू नाव सांग आणि तू सुटशील”. पण मी नाव सांगितलं नाही. कालांतराने मी ती नोकरी सोडली आणि मला दुसरी नोकरीही मिळाली. परंतु माझी ती मैत्रीण माझ्या नव्या नोकरीच्या ठिकाणी मला सतत कॉल करून त्रास देऊ लागली. पण तेव्हा मला तो त्रास, त्रास वाटत नव्हता. दरम्यानच्या काळात तिनेही काही कारणामुळे ती आधीची नोकरी सोडली आणि मग आम्ही दोघींनी मिळून नवीन सेंटर सुरु करायचं ठरवलं. सेंटरसाठी कुणीतरी भागीदार हवाच होता आणि तीही म्हणत होती कि माझ्यामुळे तिचंही स्वप्न पूर्ण होतंय. पण खरं पाहता ती फक्त एक गरज म्हणून हे करत होती हे मला समजलंच नव्हतं. ती गोड बोलून माझ्या भावनांचा, माझा फक्त वापर करत होती. मी तिच्यात एवढी गुंतले होते कि आता सेंटरसाठी मी माझी नोकरीही सोडली होती. आणि आता आमचं सेंटरही आता चांगलं चालायला लागलं होतं. मी खूप खुश होते आणि तिचंही चांगलं भागत होतं. कारण तिची गरज पूर्ण व्हावी म्हणून मी सेंटरमध्ये मिळणाऱ्या पैशाचा जास्तीचा भाग तिला देत होते.
आमचं चांगलं चाललं होतं पण एक दिवस अचानक तिने मला तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो मुलगा कोल्हापूरचा होता. आता मी तिच्यावर पूर्णपणे अवलंबून रहायला लागले होते. एक दिवस तर तिने मला अचानक सांगितलं कि तुझं तू बघ, मी यापुढे तुला मदत करू शकणार नाही. दिवस-रात्र चालणारे कॉल अचानक बंद झाले. मला एकटं पडल्याची जाणीव झाली आणि मी नैराश्येच्या गर्तेत लोटले गेले.
मी नैराश्यामध्ये जाणं स्वाभाविक होतं कारण ज्या व्यक्तीच्या कॉलेज ऍडमिशन पासून ते तिचं सगळं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून मी सगळ्या प्रकारची मदत केली, तिला मानसोपचार क्षेत्रात एक नाव मिळवून दिलं, ती व्यक्ती तिचं काम निघाल्यावर आपली साथ सोडते? तेव्हा मी काय करणार होते? भावनिक गुंतवणूक तर प्रचंड झाली होती आणि तिने समजून पण न घेता नातंच तोडलं होतं. आणि आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. माझं स्वप्नतर उध्वस्त झालंच होतं. आता नोकरी पण नव्हती आणि साथही. सगळंच संपलं होतं.
मी प्रचंड नैराश्यामध्ये गेले आणि मी आता नको त्या मार्गाला लागले होते. म्हणजे मी आता गुरुजी, भोंदूबाबा यांच्याकडे जायला लागले होते. ते पण तिने परत येऊन आमचं सेंटर पुन्हा सुरु करावं म्हणून. मी त्यासोबत देव-देव पण करत होते. माझा पूर्ण दिवस त्याच्यातच जायला लागला. सकाळी एक गुरुजी, दुपारी एक, संध्याकाळी दुसरे. यातील काही लोक काळीविद्या जाणणारे पण होते. पण तसे मी काही अघोरी उपाय नाही केले. कारण मुळातच मला त्रास द्यायचाच नव्हता. मी एकदा तर स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांच्यापायावर डोकं ठेवून अक्षरशः रडले होते. त्यानंतरही बऱ्याचदा मी स्वामींपाशी रडले. त्यांच्याकडून बऱ्याचदा संकेतही आले, “ती व्यक्ती योग्य नाही, तिने फक्त तुझा वापर केलाय, सोड ते सगळं आणि पुढे जा”. पण मी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. मी दर मंगळवारी चर्चमध्ये पण जायचे. १३ मंगळवार असं केलं तर आपली इच्छा पूर्ण होते असं कुणीतरी सांगितलं होतं. आतातर या सगळ्या गोष्टींवर पैसे खर्च करून माझ्याकडे पैसे पण उरले नाहीत. मी तर एकदा ४ जानेवारी २०१६ रोजी मुठा नदीवर जीवपण द्यायला गेले. काही दिवसांनी माझ्या स्वामींना माझी दया आली असावी आणि अचानकपणे माझी खूप जुनी मैत्रीण सोनाली हि मला म्हणाली तू खूप कष्ट घेतेयेस पण तुला यश येत नाहीय, तर तू एकदा माझ्यासोबत कीर्तीताईंकडे आरतीला येतेस का? तुला त्या काहीतरी उपाय सांगतील. तिने विचारलं आणि मी लगेच हो म्हणाले कारण माझं फक्त ते काम व्हावं असं मला वाटत होतं.
साधारणतः जानेवारी महिन्यातला तो गुरुवार होता. मी आरतीला जायचं ठरवलं होतं पण बाबांपर्यंत पोहोचणं सोपं थोडीच असतं? त्या दिवशी सोनाली आणि माझा एकमेकींना काही केल्या फोन लागेना. त्यामुळे मीही माझ्या त्याच मत्रिणीसोबत तिच्या कामात तिची मदत करत हिंडत होते. त्यातच अचानक सोनालीचा मला फोन आला आणि ती म्हणाली, “अगं मला आताच समजलं कि उद्या माझी परीक्षा आहे, तरी मी आज काही तुझ्यासोबत येऊ शकणार नाही, तेव्हा तू असं कर कि तू आज माझ्या ताईसोबत जा”. आता मला आधी अशा ठिकाणी जायचं होत कि जिथले रस्ते मला माहिती नव्हते, तिच्या ताईला मी कधी पाहिलं नव्हतं, आमची ओळख नव्हती. सोनाली फक्त एवढंच म्हणाली कि ती माझ्या सारखी दिसते! जा समजेल तुला. आता मला खूप कमी वेळात रस्ता आणि तिच्या ताईला शोधायचं होत. त्यात मी माझ्या स्कुटीला खूप लांब पार्क केलं होत. त्यातच माझी मैत्रीण जिच्यासोबत मी होते ती माझे पाय खेचू लागली, म्हणाली आता कुठे इतक्या लांब जातेस, उगाचच त्रास होईल. अचानक तिला माझी एवढी काळजी कशी काय वाटावी? जी अर्ध्या वाटेतून मला सोडून गेली होती.
पण मी मात्र ठाम निश्चय केला आणि मी बाबांपर्यंत पोहोचले. त्या दिवशी मला बाबांची आरती करायला मिळाली. बाबांची आरती करताना मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. मी फक्त त्यांच्या फोटोसमोर उभी होते. माझ्या हातापायात अजिबात त्राण नाही असं काहीस मला वाटत होत. मला दरदरून घाम फुटला होता. का ते काहीच कळत नव्हतं. मी फक्त त्यांना बोलले, “मी तुम्हाला ओळखत नाही, फक्त माझं काही चुकलं तर मला माफ करा”. एवढं सांगून मी माझी तीच इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. दोन गुरुवारी आरती झाल्यानंतर किर्तीताईंजवळ मी मैत्रिणीचा आणि काऊन्सलिंग सेंटरचा विषय काढला. त्यावर त्या मला म्हणाल्या जे काही करायचं ते तू तुझं एकटीने कर. त्या मुलीचा विषय सोडून दे. तिच्याशी बोलणं कमी कर आणि तुझं आता काय चाललंय ह्याची सतत तिला इत्यंभूत माहिती देणं बंद कर. माझ्यासाठी हे करणं खूप कठीण होत कारण मी जे मागत होते तेच मला मिळणार नव्हतं. पण काय माहित, हे समजून पण मला बाबांकडे यावंसं वाटत होत. मी गुरुवारच्या आरतीला आणि ताईंकडे हेडमसाजला येत होते पण अजूनही मी माझ्यात नव्हतेच. साधारण ३-४ आरत्या झाल्यांनतर मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात गढूळ पाणी होत आणि त्या पाण्यात एक खूप खोल भवरा होता, जो मला वरून दिसत नव्हता. मी सायकलवरून येत होते आणि मी त्या भवऱ्यात अडकून पडणार तेवढ्यात त्या सायकलचं पुढचं चाक कुणीतरी खूप जोर लावून पकडलं आणि मला वाचवलं. त्यांनतर मला तो चेहरा दिसला. मला वाटलं स्वामी आहेत की काय! पण जेव्हा आता तो चेहरा माझ्या समोर येतो तेव्हा कळत कि ते दुसरे तिसरे कुणी नसून, आपले देवबाबाच होते. त्यांनी मला एका मोठ्या संकटापासून वाचवलं होत. जर मी त्या भवऱ्यात पडले असते तर खूप वाईट अडकले असते.
मी हेडमसाजच्या वेळेस ताईंना हे सगळं सांगितलं तर ताईंनी माझी पाठ थोपटली आणि मला म्हणाल्या, “तुला हे संकेत होते, तू वाईट गोष्टीत अडकत होतीस आणि बाबांनी त्यापासून तुला वाचवलं आहे”. कदाचित तेव्हा पासूनच माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली असावी.
दुसरा अनुभव मला असा आला कि साधारणतः मध्यरात्र असावी मी गाढ झोपले होते आणि अचानक मला जाणवलं कि भूकंप होत आहे. पण मला उठवतही नव्हतं. पण कोणीतरी हा विश्वास देत होतं कि तुला काही होणार नाहीये. सकाळी मी आईला विचारलं, “रात्री भूकंप झाला होता का?” तर तिने मला वेड्यातच काढलं. कारण असं काहीच झालं नव्हतं. पण मला तर नक्की जाणवलं होतं आणि तो अनुभव भीतीदायक नसून छान आणि काहीतरी वेगळा होता. मी ताईंना भेटल्यावर सांगितलं तर ताई बोलल्या, “जेव्हा सद्गुरू आपल्या जवळ आशीर्वाद देण्यासाठी येतात तेव्हा तिथे खूप जास्त कंपनं निर्माण होतात. शेवटी ती एक शक्ती आहे. तो भूकंप नव्हता, ती कंपनं होती. म्हणून तुला असं जाणवलं असेल. यापुढे झोपताना हात-पाय धुवून झोपत जा”. त्यांनतर हळू-हळू माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली.
मी गेले ७ महिने घरी बसून होते. परंतु नंतर मला मार्चमध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये नोकरीसाठी बोलावलं गेलं. मी तिथे २ महिने इंटर्नशिप केली तिथे मला नोकरीतर नाही मिळाली, परंतु मला माझ्या नैराश्यातून बाहेर पडण्याची संधी मिळाली होती. आता मी माझ्या कोषातून बाहेर पडायला सुरुवात झाली होती.
नंतर एप्रिलमध्ये मी SummerCamp केला. माझ्या मदतीसाठी कुणीच नव्हतं, कारण बाबांनी भागीदारी नाही करायचं असं आधीच सांगितलं होतं. आता अगदी जागा बघण्यापासून ते मुलं शोधण्यापर्यंची तयारी होती. आता तर सगळीकडेच SummerCamp होतात. तसं रिस्पॉन्स मिळणं अवघड होतं. पण मला पैशांची गरज होती. माझ्याकडे १ महिना होता. सगळीकडच्या जाहिराती कधीच झाल्या होत्या आणि माझी सुरुवात पण नव्हती. पण मी बाबांचं नाव घेऊन त्यांनाच प्रार्थना करून सुरुवात केली आणि मला माझ्या घराजवळच एक खूप छान जागा मिळाली. आता मुलं कशी मिळणार? मला माझ्या जागेचं भाडे जाऊन जर नफा व्हायला हवा तर निदान १५ तरी मुलं हवी होती. मग मी एका शाळेच्या शेवटच्या प्रोजेक्ट मीटिंगला गेले. प्रत्येक वर्गात जाऊन जाहिरात केली आणि आश्चर्य म्हणजे कमी-जास्त होता होता माझ्याकडे बरोबर १५ मुलांची नोंद आली. खरंच बाबाच होते माझ्यासोबत. यादरम्यान मी जी मुलगी कामासाठी पाहिली होती त्या मुलीचं लग्न ठरलं आणि तिने कॅम्पला येण्यास नकार दिला. नंतर मी खूप मुली शोधल्या पण मला मुली नाही मिळाल्या. मग मी आईला घेऊन कॅम्पला सुरुवात केली. पण आईची म्हणावी तशी मदत होईना. मला काहीच सुचेना. मी बाबांना म्हटलं तुम्हीच आता मार्ग दाखवा आणि तुम्हाला सांगते, प्रत्येक दिवशी कोणीना-कोणी मदतीला आले. कधी पालक तर कधी कोणी मैत्रीण. मला चित्र काढण्यासाठी एक मुलगी हवी होती तर अचानक दोन दिवस एका मुलीची बहीण येऊन चित्र काढून देऊन गेली. शेवटच्या दिवशी पार्टीला दोन मैत्रिणी येऊन टॅटू मेकिंग करून गेल्या. बाबांच्या आशीर्वादाने कॅम्प खूप छान पार पडला. सगळ्यांना खूप आवडलं.
एप्रिल महिना तर गेला पण आता पुढे काय? हा प्रश्न माझ्यापुढे होता. कारण केसेस खूप नव्हत्या. तर आता कसे करणार? शिवाय अजून एक प्रॉब्लेम समोर आला होता. जिथे मी केसेस घ्यायचं ठरवलं होतं तिथल्या वरिष्ठ बाई आणि माझ्यात गैरसमज झाल्यामुळे मला तिथे जागा मिळेना आणि नवीन जागाही मिळेना. नवीन जागा घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. नातेवाईकांच्या जागा असून कोणी मदतीला तयार नव्हते. मग मी त्या केसेस घरी जाऊन किंवा बाहेर भेटूनच करायला लागले. पण असं सगळ्यांच्या घरी जाणं मला शक्य नव्हतं. मला नवीन नोकरी बघणे खूप गरजेचं होतं. तेवढ्यात मला एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने एक नोकरी असल्याचे सांगितले. मला ती नोकरी मिळाली आणि माझा एक मोठा प्रश्न सुटला. पण तिथे मी एक गरज म्हणून जात होते. मी तिथं सुरुवातीच्या ट्रेनिंगच्या काळात एकटीच पहिल्या बाकावर बसायचे, जास्त कुणाशी बोलायचे नाही. एक महिना असाच गेला.
नंतर आमच्या ऑफिसमध्ये प्रोजेक्टसाठी ग्रुप केले आणि हळूहळू माझी इतरांशी मैत्री झाली. आता आमचा एक छान ग्रुप बनला. मी त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जायला लागले. आधीसारखं एन्जॉय करायला लागले. मी खूप खुश होते. माझ्या नोकरीत मला पगार वेळेवर मिळत नव्हता, पण माझं भागत होतं आणि तिथे त्रास फार नसल्याने मला त्याचं दुःख नव्हतं. पण तिथे कोणीच नीट काम करत नाहीये आणि ती कंपनी कधीही बंद होईल हि गोष्ट काही मला माहिती नव्हती. पण कदाचित बाबांना पुढचे माहिती झाले असावे.
एकदिवस मला एका मैत्रिणीचा फोन आला, “रमा, एन.डी.ए. मध्ये ArmySchool मध्ये कॉउंसिलरची पोस्ट आहे.” मी तेथे गेले. माझी निवड झाली. मी ती नोकरी स्वीकारली आणि पुढल्याच आठवड्यात माझी त्याआधीची कंपनी बंद पडली. पण मी मात्र सुरक्षित होते. मी ज्या महिन्यात काम केलं नव्हतं त्या महिन्याचा पगार कोणालाच मिळाला नव्हता. अचानक सगळे बेकार झाले. पण बाबांनी माझी सोय आधीच केली होती. बाबांनी माझ्यासाठी खूप पुढचा विचार करून ठेवला होता.
आता जी नोकरी होती तीच टिकवण्याशिवाय पर्याय नव्हता. पण एवढं हेक्टिक शेड्युल कसं मॅनेज होईल? हा प्रश्न होताच. माझी तब्बेत साथ देत नव्हती. पण नशिबानं मला इतक्या सुट्ट्या मिळत गेल्या कि त्यामुळे मी जरा रिलॅक्स होऊन परत काम करत होते. आता माझ्या कॉऊन्सलिंगचाही चांगला परिणाम दिसत होता. कॉउंसेलिंग माझं काम आहे ते मला येतं. पण वर्गावर जाऊन मुलांना lifeskills शिकवणं मला जमत नव्हतं. नववी-दहावीची मुलं तर मला खूप त्रास द्यायची. मला आता अगदीच नको झालं होतं. बाबांना मी बोलायचीपण, “मला नाही होतं आता!” पण नोकरी सोडणं शक्य नव्हतं.
पण खरंच बाबा खूप छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतात. त्यांनी माझी अवस्था बघून इंटर्नशिपसाठी एक मुलगी पाठवली. आज ती शाळा सुरु होऊन ५ वर्ष झाली पण आजवर एकही व्यक्ती इंटर्नशिपसाठी आली नाही. पण यावर्षी पहिल्यांदाच ती आली आणि शेवटच्या महिनाभर तिने सगळे तास घेतले आणि माझं ते वर्ष पूर्णपणे सुरळीत पूर्ण झालं. आता माझ्या कॉउंसेलिंग आणि माझ्या कामावर माझ्या शाळेचे मुख्याध्यापक पण खुप खुश होत्या. हि नोकरी करत असतानाच मी सोबत कॉऊन्सलिंग च्या केसेस पण घ्यायला लागले. खरंतर हेच माझं स्वप्न आहे, स्वतःच कॉऊन्सलिंग सेंटर असावं. त्याच्याच दिशेने मी पहिले पाऊल टाकत होते.
खरंतर मला ज्या केसेस मिळत होत्या तोही एक चमत्कारच होता. कारण मी एक वर्षांपूर्वी ज्या शाळेत awareness दिला होता त्या शाळेशी वर्षभर काहीही संबंध नसताना अचानक तिथून केसेस मिळणं मला थोडं वेगळं वाटत होतं. पण बाबांच्या आशीर्वादाने मला केसेस मिळत होत्या आणि त्या solved पण झाल्या होत्या. आणि विशेष म्हणजे काही केसेस कशा solved झाल्या हे मलाही नाही सांगता येणार. मला एवढंच माहिती आहे, बाबा मला खूप मदत करतायेत आणि असंच सदैव त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असावा हीच प्रार्थना.
– रमा आमटे, पुणे