हेचि दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा

।। ॐ श्री साई अनंत ।।

मी पूर्वीपण माझे अनुभव सांगितलेत, पण जेव्हा पुन्हा ठरवलं कि माझा अनुभव परत सांगावा, तेव्हा मीच खूप उत्साहित झाले. यामागे एक स्वार्थ आहे, तुकाराम म्हणतात तसं, 

” हेचि दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा,
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी,
ना लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.”

म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर काही दिवसापासून मी पाहतेय, बाबांबद्दल बोलणं, माझ्या प्रत्येक अनुभवांत त्यांना शोधणं मला खूप आनंद देतंय. मग पुन्हा एकदा तुमच्यासोबतीत त्यांचं गुणसंकीर्तन करण्याची संधी मिळतेय तर त्याला मी कसं नाही म्हणेन? I wanted to enjoy the happiest experience again one more time with your company. 

माझ्या बद्दल सांगायचं तर मी जेव्हा किर्ती ताईंना पहिल्यांदा भेटले तेव्हा माझा कुरुक्षेत्रावरचा अर्जुन झाला होता, फक्त प्रश्न होते आणि उत्तरं मिळत नव्हती. सगळं होतं, नोकरी, शिक्षण, कुटुंब, पण तरीही विषाद होता, खंत होती. असमाधानी आयुष्य जे फक्त संपवावं असच वाटायचं. बाबांनी शिकवलं कसं लढावं, आयुष्यातली दुर्बलता सोडून कोणत्याही प्रकारच्या क्षणांना कसं सामोरं जायचं. He became my Sarathi, my Krishna!!

बाबा फक्त आपल्याला कोणत्याही बिकट प्रसंगातून बाहेर नाही काढत, तर ते आपल्या सर्वांगीण विकासाकडे पण लक्ष देतात. कसं? मी उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न करेन. पहिले तर बाबा आपला सयंम वाढवतात. उदाहरणार्थ, आपण तिकिटाच्या रांगेत उभे असतो, रांग लहान असते, पण तरीही बाजूची रांग मोठी असूनही संपते आणि आपण तिथेच. खूप चिडचिड होते. आपण चिंतीत होतो, निराश होतो. प्रत्यक्षातपण असच असत खूप असे प्रसंग असतात कि आपल्याला हवे तेच मिळत नाही आणि आपण आपल्या नशिबाला दोष देतो. पण बाबा हाच आपला दृष्टिकोन बदललतात. आता रांगेत ऊभं राहून तिकीट नाही मिळालं तरी आपण विचार करतो कि पुढला प्रवास बाबांना माहितीये, कदाचित काही विघ्न असतील जी आता माहिती नाहीत, म्हणून आपल्यासाठी तिकीट नाही आणि हा निश्चितच आपला प्रवास नाही. निश्चिन्तपणे आपण म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठीच.

बाबा आपला आत्मविश्वास वाढवतात. 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते |
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || ९-२२ ||

आपण काय करायचं? त्यांच्यावर सगळी जबाबदारी टाकून फक्त ते सांगतील तसं वागायचं. आपण हे एवढंच करायचं. माझ्याबद्दल बोलताना मी काय बोलावं हेच ठरत नव्हतं माझं, कारण खूप आहे सांगण्यासारखं,

मला नेहमी हेच वाटतं, बाबांनी एक character निवडलं, अधिक अचूकपणे सांगायचं तर, त्यांनी एक मातीचा घडा घेतला रिकामा, रंग नाही रूप नाही बाजारात किंमत नाही, आणि मग त्याला खूप छान सजवलं त्यांना हवं तसं. घडा तोच पण आता त्याला किंमत आहे, वजन आहे.

काही वर्षांपूर्वी मी खूप निराश, उदास असायचे, अगदी रस्त्यावर चालताना पण रिक्त मनाने वावरायचे.  कारणं? तशी म्हटलं तर काहीच नाही, आणि जर हवीच असतील तर कदाचित, आपण काही घटकांचा विचार करू शकतो जसे की पालकांकडून आवश्यक प्रोत्साहन नसणे, उगाचच त्रास देणारे नातेवाईक, लग्न ठरत नाहीये. पण का नाही ठरत कारण कळत नाहीये, अगदी ते का करायचं हे पण! Career नाही म्हणता येणार पण job होता, पण तोही कशातच फार गंभीरता नव्हती. पुढे काय? काही माहिती नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट तेव्हाही प्रकर्षाने जाणवायची कि कुणीतरी आहे जे खूप जवळून आपल्याला संभाळतंय. 

I have grown up in a surrounding which was considered as a slum. गोळीबार रस्ता, ओवाळून टाकलेली वस्ती. पण तिथेही खूप संरक्षित जगले. खूप साधे आणि त्यांच्यापरीने महत्वाकांक्षी असे आई बाबा.  माझं बालपण तसं साधं आणि बरं होतं. जसं college सुरु झालं, तसा आत्मविश्वास कमी होत गेला. मला खूप भीती वाटायची, मला कळलंच नाही, मला कधी नैराश्याने ग्रासलं. भीती वाटते म्हणून मी मठात जाऊन बसायचे. शिक्षण चालू होत, पण खरंच सांगायचं तर मी ते का शिकतेय, किंवा मी ते का निवडलं मला खरंच तेव्हा कधी कळलं नाही. आता पुढे काय केलं पाहिजे, मग कोण मार्ग दाखवणार? काही कळत नव्हतं. म्हणूनच तर मग मी खूप ज्योतिषांना भेटले, खूप पूजा केल्या, खूप मार्ग चाचपडले. मला शांत व्हायचं होत. मग स्वाध्याय, मनशक्ती, संमोहन, इस्कॉन, रेकी अस बराच काही….. जिथे कुठे जाऊन मन शांत होऊ शकतं, ती अज्ञात भीती जाऊ शकते ते सगळं केलं. शांतता नाही मिळाली पण गोंधळ वाढला. दरम्यान माझ्या तब्बेतीवर या साऱ्याचा परिणाम होत गेला. मला केसगळतीचा त्रास होत होता. मग खूप उपचार केले. अगदी अलोपॅथी, होमिओपॅथी, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर, पंचकर्म, आयुर्वेदिक, वगैरे, वगैरे. परिणाम? काहीच फरक नाही, जैसे थे!! एके दिवशी माझ्या रेकीच्या मॅडम मला म्हणाल्या एक व्यक्ती आहे जिच्याकडे गेल्यावर तुला मदत मिळू शकेल… आणि अशाप्रकारे मी किर्ती ताईंना भेटले. 

मी भेटले तेव्हा मला त्यांच्या बद्दल काहीच माहिती नव्हतं. बस मला इतकंच माहिती होत कि त्या आयुर्वेदिक massage treatment करतात. देवबाबा भेटायला अजून एक / दीड वर्ष लागले. खरं म्हणजे बाबा आहेत हे कळल्यावर पण मी जेव्हा इथे यायला लागले तेव्हाही खरंतर बाबांचा खूप ओढा होता असं नाही. हो पण प्रामाणिकपणे येत गेले. त्याच कारण किर्ती ताई… त्यांचं प्रेम… 

मी म्हटलंय आधी कि मी खूप ज्योतिषांना भेटले, आणि बरेच जण म्हणाले होते कि जागा बदल, बदल आपोआप घडेल. ज्या मुलीने ३० वर्ष मुंबई आणि कोल्हापूर इतकच केलय, तिने घर सोडून अगदी गाव बदलायचं? कुठून आणायचं एवढं बळ? अशक्य होतं. गुंता सोडवायचा तर होता पण दोरापण तुटू द्यायचा नाही. बाबा!! त्यांची किमया. ते किमयागार आहेत. याला म्हणू शकतो आपण चमत्कार! जर म्हणायचं असेल तर. बाबांनी आयुष्य रुळावर आणलं.

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा।
    निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः।। ३-३०।।

माझ्यावर सर्व कर्मांचा भार टाकून तू फक्त तुझं काम कर. गोष्टी खूप पटापट झाल्या. माझ्या भावाचं लग्न ठरलं. हा खूप मोठा प्रसंग आहे. ज्या सामाजिक पार्श्वभूमी मधून मी आहे, तिथे असे निर्णय सहसा नाही होत. तो माझा लहान भाऊ आहे. त्याचं लग्न फेब्रुवारी मध्ये झालं आणि तो लगेच पुण्याला शिफ्ट झाला. त्याची बायको तर खूप समजूतदार, आणि नव्या आणि पुरोगामी विचारांची आहे. १६ एप्रिल २०१२, उत्सवानंतर ३ दिवस असावेत, माझं Sandoz मधलं डिपार्टमेंट अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केलं. खूप मोठा धक्का होता सगळ्यांना. मुंबईतून एकही call नाही. त्या दरम्यान Ph.D. ला ऍडमिशन घेतलं होत काय करणार होते मी? एकच ऑफर आली, ती पण नोव्हार्टीस, हैदराबाद.

जागा बदलली माझी, कोणतीही गुंतागुंत न होता. मी फक्त तिथे गेले, माझी सगळी व्यवस्था आधीच झाली होती. हैद्राबादमधला काळ हा माझ्या आयुष्यातील खूप अविस्मरणीय काळ आहे. खूप मस्त, काळजी करणारी जिवाभावाची माणसं भेटली, भेटवली ती आधीच योजून ठेवली होती माझ्यासाठी!!  

मी आधीच म्हटलंय कि माझी Ph.D. करण्याची इच्छा होती. Sandoz बंद होण्याआधीच्या उत्सवाला मी बाबांना प्रार्थना केली होती, बाबा माझी प्रगती होउदे. त्यानंतर काही दिवसांची गोष्ट, रविवार होता, मला एक phonecall आला. समोरची व्यक्ती म्हणाली मी Dr. Lokhande बोलतोय. तुला अजूनही ph.D. करण्याची इच्छा आहे का? मला तर हेच आठवत नव्हतं कि हे कोण लोखंडे? मी कधीतरी जेव्हा ph.D. साठी प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना भेटले होते. पण तेव्हा ते रिटायर्ड होणार होते. त्यांनी तेव्हा माझा नंबर घेतला होता आणि मग इतक्या वर्षांनी कॉल केला. तर अशा चमत्कारिकपणे मला गाईड मिळाले आणि ph.D. ला ऍडमिशन पण. हैदराबाद ला जाताना प्रश्न होता कि माझ्या शिक्षणाचं पुढे काय होईल? पण सगळीकडे मदत तयारच होती आणि खूप मस्त झालं सगळं.

पण सगळ्यात उत्तम प्रसंग अजून येणार होता …. 

माझी ph.D. पूर्ण झाली, मला पदवी मिळाली. एका महिन्यात मला एक नव्या vacancy बद्दल कळलं, जॉन्सन अँड जॉन्सन. त्या पदासाठी लागणाऱ्या साऱ्या आवश्यकता आणि पात्रता पूर्ण होत होत्या. त्याआधी सगळे म्हणाले होते मला, जर तुला मुंबई मध्ये परतायचंय तर तुला तडजोड करावी लागेल. कुठलीपण कंपनी असेना का, घे ऑफर आणि जा. मी नेहमी विचार करायचे का स्वीकारायची कोणतीही ऑफर? असं कसं आपणच आपल्या career चं नुकसान करायचं? अशी तडजोड मला नाही करावी लागणार. मग मी interview दिला, पण त्या सरांना जाणवलं कि माझं specialization दुसऱ्याच विषयांत आहे आणि ते दुसऱ्या एका नवीन निर्माण केलेल्या पदासाठी लागणारं आहे. त्या जागेसाठी interview घेणारी अनायसे भारतात आलीये. त्यांनी वेळ ठरवली. त्याच दिवशी ५ वाजता माझा दुसरा telephonic interview झाला क्रिस्टीन बरोबर. ती आधी म्हणाली जर सगळं नीट झालं तर तू येशील का मुंबई ला उद्या? पण सगळं नीट झालं तर! संध्याकाळी ५.३० वाजता म्हणाली बुक कर तिकीट. उद्या यायचंय तुला मुंबईत. मी दुसऱ्या दिवशी तिला भेटले. दोन तास गप्पा मारल्या. परंतु HR मॅनेजरला याची खात्री पटली नाही की मी त्या स्थानासाठी योग्य असेन. मग आणखी सहा महिने गेले, दरम्यान त्यांनी आणखी खूप उमेदवार पडताळले. ६ महिन्यांनी मला ऑफर लेटर मिळालं. पण त्यांनी नीट पगारवाढ नाही दिली. तो मॅनेजर तर मला म्हणालाही कि, “I will not even increase single penny in this package!!”

सगळे मला म्हणाले स्वीकार कर offer. जर तू या कंपनीला नाही म्हटलं तर ते तुला ब्लॅक लिस्ट करतील आणि पुढे कधीही तुला इथे येता नाही येणार. तुझ्यासाठी जॉन्सन चे दरवाजे बंद होणार. तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागेल. मी ताईंना विचारलं, त्या म्हणाल्या आपल्याला देणारे बाबा आहेत. तुला तुझा स्वाभिमान गमावून काही नाही करायचं. मी नकार कळवला. माझ्या मते तो दिवस कदाचित २३ किंवा २४ डिसेंबर २०१४ असणार जेव्हा मी नाही म्हटलं. ७ जानेवारी २०१५ ला मला एक ई-मेल आला. माझ्या पर्सनल ई-मेल अकाउंट वर क्रिस्टीनcha. तीच जिने माझा interview घेतला होता. तिने लिहिलं होत, ” I thought we were connected very well during the interview, why have you rejected this offer? If any concern which can be handled by me let me know”.

मी सांगितलं सॅलरी नीट नाहीये. ती बोलली HR बरोबर. जो HR manager मला म्हणाला मी तुला single penny पण वाढवून नाही देणार त्याने मला आणखी १५% वाढवून दिले. मला पगारवाढ आणि मुंबई दोन्ही मिळालं आणि तेही कोणतीही तडजोड न करता माझा स्वाभिमान राखून!! 

बाबा बऱ्याचदा आपल्याला काय नाही करावं, किंवा कशापासून दूर राहावं हे सांगतात. पण कधीतरी असं होतं कि मी ते वेगळ्या पद्धतीने करून पाहायला जाते, म्हणजे त्यात बाबांचा आदेश मोडावा हा उद्देश नव्हता कधीच, पण तरीही का माहिती नाही पण कधीतरी मी थोडं वेगळं वागले. एक उदाहरण जे खूप काही शिकवून गेलं, मला बऱ्याच दिवसांपासून बाईक चालवायची होती, मग मी ती शिकले, learning licence पण मिळवलं, आणि मग ताई म्हणाल्या तुला ते फक्त शिकायची परवानगी होती बाबांकडून, चालवायची नाही. खूप वाईट वाटलं. मग म्हटलं निदान सायकल तरी चालवू का? तर पुन्हा नकार मिळाला. मी नवीन सायकल नाही तर मैत्रिणीची जुनी सायकल दुरुस्त करून चालवायला ठरवलं, सहज सवय राहावी म्हणून.  एक सायकलिंग चा कार्यक्रम होता गोव्यात – ५ दिवसांचा, मी त्यासाठी नाव नोंदवलं आणि प्रॅक्टिस करायला लागले. पण बाबा म्हणाले होते नको, तर ते पूर्ण नको, ह्याचा विसर पडला मला. प्रॅक्टिस करायचे मी रोज सकाळी आणि अपघात झाला. मी साध्या रस्त्यावर पडले आणि माझं उजव्या हाताच्या कोपराचं हाड तुटलं, इतकं कि ते काढावं लागलं, सक्तीचा २ महिन्यांचा आराम. बाबा मला तर आधीच नाही म्हणाले होते नाही चालवायचं दुचाकी वाहन. शॉर्टकट नसतात कशालाच. मी त्यांचा सल्ला नाही ऐकला, मला त्रास सहन करावा लागला. पण यातही मला जाणवत होतं कि बाबांनीच मला सगळीकडे मदत केली. अपघात सकाळी ६:३० वाजता झाला, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते घरी यायला, एक रिक्षावाला मला घरी सोडून गेला काहीही न घेता. माझ्या शेजारच्या काकूंना मी म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊयात, त्या मला ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या आणि माझं ऑपरेशन करणारे डॉक्टर हे मुंबई मधील बेस्ट सर्जन आहेत, हे मला ऑपरेशन नंतर कळलं. कोपराच फ्रॅक्टर हे थोडं क्रिटिकल मानलं जातं. पण त्यात त्यांनी काही उगाच वायरिंग केलं नाही किंवा मेटल नाही वापरलं, ते खूप चांगल झालं हे पण मला माझ्या फिजिओथेरपिस्टने सांगितलं तेव्हा कळलं. आता विचार करताना जाणवतं, किती तरी छोट्या गोष्टी ज्या मलाही नव्हत्या माहिती, त्या सगळ्या बाबांनीच करून घेतल्या. पण आता पक्के ठरवलंय, नो शॉर्टकट्स, बाबा म्हणणार तेच आणि तसेच करायचं.

आताही खूप प्रसंग आहेत, येतात ज्यात सतत जाणवत असतं कि बाबा आहेत सोबत म्हणून हे घडतंय. पण ते इतकं normal routine चा भाग झालंय. आतातर बाबांशिवाय वेगळं आयुष्य असतं हे मनातही येत नाही. अगदी म्हणायचं तर, अठराव्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन जे म्हणतो तसं काहीसं,

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।१८-७३।।

सगळी नाती, व्यवहार, वेदना, आनंद, सगळं काही बाबांपासून सुरु होतात आणि तिथेच लोप पावतात. सतत ते असतात बरोबर. खूपदा त्यांचं अकारण कारुण्य जाणवतं. मग ते मी हैदराबादला आजारी असताना खिचडी देणं असेल किंवा गेल्यावर्षी माझी दाढ काढतानाचा प्रसंग असेल. ते असतात सोबत, सतत!!

बाबांनी माझ्यात आमूलाग्र बदल घडवलाय, मला पूर्णपणे रूपांतरित केलय. ट्रेकिंग, हायकिंग, क्लाइंबिंग, पोहणे, प्रवास असं बरच काही करायचं धाडस पण तेच देतात. खूपदा आता माझे मित्रमैत्रिणी किंवा माझी भावंडं येतात, म्हणतात तुझा हेवा वाटतो. तेव्हा मस्त वाटतं. बाबांनीच शिकवलंय स्वतःवर प्रेम करायला, आनंदी राहायला.

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।१८-७८।।

त्यांनीच बनवलंय आत्मनिर्भर!! कॉन्फिडन्ट!! आयष्य खूप मस्त आहे आणि ते होत जाणारे. आयतं मिळत नाही, उठ, कामाला लाग, मदत माग, ती तयारच आहे. किती असतात, ज्यांच्या परिश्रमाला आशीर्वादाची जोड असते? माझ्या आहे, कारण माझ्याबरोबर माझा योगेश्वर आहे. माझे बाबा…                                                                                                                                        

-सुरेखा कोल्हाळ, बांद्रा, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *