बाबांवरचा विश्वास आणि स्त्री वेषातले दर्शन

प्रिय बाबा,

आज अंकासाठी लेखन करण्याच्या निमित्ताने मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे ते लिहीत आहे. 

प. पु. देवबाबा, गुरुवर्य देवबाबा असे म्हणता म्हणता तुम्ही माझे बाबा कधी झालात कळलंच नाही. मी जशी माझ्या बाबांना सगळं मनातलं सांगायचे तसंच तुम्हाला सांगायला कधी लागले, हट्ट करायला लागले कळलंच नाही. तुमच्या मायेची, आधाराची, विश्वासाची बैठक माझ्या मनात कधी रुजत गेली हे सांगणं कठीण आहे. पण तरीही काही प्रसंग जरूर सांगावेसे वाटतात कारण भक्तीची सुरुवात हि कितीही स्वार्थी, अडचणी, प्रसंगांनी झाली तरीही ती फुलते फक्त विश्वासाने. 

मी सर्व देवांना मानत असे, पण मला कोणत्याही एकाच देवाच्या भक्तीत स्वतःला बांधता आले नाही. माझ्या दृष्टिकोनातून भक्ती हि कोणत्याही रूपात बांधील नसावी. सर्व देव एकच. फक्त रूपं वेगवेगळी असं मी मानत असे. पण आपला पहिला संवाद झाला तेव्हाच मला जाणीव झाली की माझी द्विधा मानसिकता हि तुमच्या पर्यंत पोहोचली आहे, काहीही न सांगता. तुम्ही मनकवडे आहात ह्याची प्रचिती यायला लागली. भक्तीतच शक्ती आहे, विश्वासातच सामर्थ्य आहे याची जाणीव घट्ट रुजायला लागली आणि आपले संवाद वाढत गेले. मी कधीही माझ्या घरात तुमचा फोटो सुद्धा ठेवला नव्हता तरीही आपले वेळोवेळी संवाद घडत गेले.

खास सांगावासा वाटतो तो प्रसंग म्हणजे तुम्ही माझ्या घरात छान सुटाबुटात अगदी विलायती रूपात आलात आणि मी स्वतः गढून गेले की हि व्यक्ती माझ्या ओळखीची आहे पण कोण? हि नजर मी ओळखते पण कोणाची आहे? तुम्हीच दर्शन दिलंत ह्याची प्रचिती मात्र पुढच्या प्रसंगात आली. काही दिवसांनी साधनेत असताना मला पुन्हा दिसलात. खास पांढऱ्या साडीत. पूर्ण डोक्यावरून पदर, कपाळी लाल कुंकू आणि तीच मायेची, प्रेमाची, सात्विक नजर. मी नखशिखांत हादरले. हे! हे तर माझे बाबा आहेत! बाबा, मला तुम्ही स्त्रीवेशात दर्शन दिलंत तरीही मी ओळखलं. माझ्या पायाला दुखापत झालेली असताना बाबा तुम्ही अवधूत शिवानंद बाबांना माझ्या पायाला हिलिंग देण्यास सांगितले. माझ्यासाठी हा प्रसंग किती मोठा आहे. ह्या भावनांचं वर्णन करणं कठीण आहे. रोज मरे त्याला कोण रडे, रोजच पाय दुखतो आणि मी माझ्या संसाराच्या, कर्तव्याच्या गरजांपुढे दुर्लक्ष करत रेटत होते. फक्त तुम्हालाच सांगायचे पाय खूप दुखतो आहे. मी एकटी नाही मला भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही, बाबा तुम्ही मला हे दाखवून दिलेत. 

काही दिवसांनी किर्ती वहिनींकडून समजले की माझा साक्षात्कार सत्यच होता. बाबा काही कालावधीत स्त्रीरूपातच होते. सप्तशती साधना हि तुम्ही दिलेली उपासना माझा मार्गदर्शक आहे. 

अजून प्रसंग सांगू इच्छिते. चंपाषष्ठीत आम्ही तळई भरतो. मी नवरा बाहेरगावी असल्याने तो आल्यावर तळई भरून घ्यायचे असे योजले होते. साधनेत असताना मला माझ्या घरात सगळीकडे भंडारा पसरलेला आहे असे दिसत होते आणि किर्ती वाहिनी, नुपूर आणि सगळे घरचे सुद्धा उपस्थित होते. मी म्हणायला लागले, “काय बाई अजब आहे हे!” पण हि मला मिळालेली पावती होती. माझी इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचली होती. नूपुरच्या घरी असलेल्या तुमच्या मूर्तीतून भंडारा आला होता आणि तो थेट इथंपर्यंत पोहोचला होता.  

वेळोवेळी असे छान, मार्गदर्शक, समाधानकारक संवाद घडत जातात आणि मला भक्तिसागरात तुम्ही डुंबत ठेवता. बाबा तुमची भक्ती, प्रेम, माया, विश्वास, आधार माझ्या आयुष्याचा पाय भक्कम करत आहे. माझा हात कधीही सोडू नका. तुमच्यापुढे मी आजही तशीच लहान चिमुरडी आहे, बाबांचा हात धरून चालणारी.

– तुमच्या भक्तीच्या ऋणात सदैव रहाणारी प्राची.

– प्राची राजे, यु.एस.ए.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *