बाबांच्या कृपेने ऑपरेशन सुसह्य

|| ॐ श्री साई अनंत||

प. पू. बाबांच्या पहिल्या स्मरणिकेत अनुभव लिहिण्याचा सुंदर राजयोग मला मिळाला आहे. हा अनुभव माझ्या सारखे अडचणीत असणाऱ्यांना मानसिक आधार मिळावा आणि प. पू. बाबांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून लिहितेय. 

सौ. किर्ती ताईंकडच्या प. पू. बाबांच्या पहिल्या उत्सवापासून मी आणि माझा मुलगा चि. प्रभास येत आहोत. त्या वेळेस माझी मानसिक, शारीरिक अवस्था वाईट होती. मन सैरभैर होते. समोरच्याच्या दृष्टीने मी मजेत होते, हसत होते, बोलत होते. एकूण आनंदी जीवन जगत होते. परंतु माझे मन मात्र थाऱ्यावर नव्हतेच. शरीरात होणारी आग कोणत्याची उपायांनी थांबत नव्हती. ना घरगुती उपायांनी, ना डॉक्टरी उपायांनी. 

डॉक्टरांचे औषध घेऊन घरी यावे मनाला वाटे, “चला आता ह्या औषधांनी आपण बरे होऊ,” तोच त्रास दसपट वाढे. प. पू. बाबांनी पहिल्या उत्सवाला डॉक्टरी उपायांची गरज नाही असे मला सांगितले होते. पण मी ऐकले नव्हते. 

परंतु जसे मला बाबा मिळाले, बाबा कळाले. माझे मानसिक आणि शारीरिक रोग हळूहळू सुसह्य होत होत थांबले. प.पू. बाबा उपाय देत गेले आणि मी ते मनापासून करत गेले. बाबांवर अतीव श्रद्धा बसली.

नुकतेच माझे Muscle tear चे ऑपेरेशन झाले. ऑपेरेशन ठरले तर शुगर नियंत्रित होत नव्हती. मी खाण्याचे पथ्य पाळत होते, चालत होते पण शुगरचे आकडे चढत्या क्रमाने वाढतच होते. पण प.पू. बाबांच्या घरगुती उपायांनी, शुगर चकित व्हावी अशी खाली आली. माझ्या सारखी इंजेकशन ला घाबरणारी व्यक्ती ऑपेरेशनला सामोरी झाले. खात्री फक्त एवढीच होती कि बाबा माझ्या जवळ आहेत. ऑपेरेशनच्या दिवशी मला सौ. नुपूर भेटायला आली. बस्स माझ्या मनाने घेतले कि तिच्या रूपात आज बाबा माझ्या जवळ आहेत.

मनात प्रार्थना एकच होती किंवा विनवणी म्हणा कि बाबा ऑपेरेशनच्या अनुषंगाने जे जे माझ्याशी संबंधित असतील त्या प्रत्येकाच्या रूपात तुम्हीच असणार आहात.  

ऑपेरेशन व्यवस्थित पार पडले. मी घरी आले. पुढे पंधरा दिवसांनी टाके निघाले. हाताची बॅग निघाली. डॉक्टर मला म्हणाले, “आता व्यायाम सुरु होईल तेव्हा खरी मजा येईल.” थोडक्यात डॉक्टरांना म्हणायचे होते कि व्यायामाने हात दुखेल. खरी गम्मत तर इथेच आहे, व्यायामाने हात जराही दुखले नाही. शुगर होती तरी टाके कोरडे होते. जेव्हा मी पंधरा दिवसांनी डॉक्टरांना दाखवायला गेले तेव्हा माझ्या हाताच्या हालचाली बघून डॉक्टरना खूप आनंद झाला. शुगर असून हातात चांगलीच रेंज आली आहे, असे ते स्वतःच बोलले. 

मी तुझ्या जवळ आहे हे प. पू. बाबा मला वेळोवेळी जाणवून देतात. मी हि माझे सारे आयुष्य बाबांच्या चरणांशी झोकून दिलं. माझे आई, बाबा, आत्या, काका, मुलगा ह्या साऱ्यांच्या रूपात मी बाबांकडे बघते आणि बाबाना प्रार्थना करते कि, माझ्या परिवारातील प्रत्येकाच्या श्वासागणिक तुम्ही आमच्या जवळ आहात. माझ्या साऱ्या परिवारालाच बाबांनी कवेत घेतलंय.

आमची नात ओवी, हा तर प्रत्यक्ष बाबांचा प्रसाद आहे. तिच्या रूपात मला बाबांनी अखंड आनंदाचा झराच दिलाय. प. पू. बाबा माझ्या मनावर अधिराज्य करतात. कधी-कधी आपल्याला एखाद्या व्यक्तींचा राग येतो असे वाटते, त्या त्या व्यक्तींचा चांगला खरपूस शब्दात समाचार घ्यावा वाटते. पण घडते मात्र भलतेच. एक चकार शब्दही माझ्या तोंडून बाहेर येत नाही, अरे मी हीच का? असे माझे मलाच वाटते.

हा लेख पुरा करताना मला सौ. किर्ती ताई, मंगेश दादा आणि सौ. नुपूर प्रति पण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ती केल्या विना ह्या लेखाला पूर्णत्व नाही. ह्या बाबांच्या घरात आमचे नेहमीच आनंदाने स्वागत होते. ह्या बाबांच्या परिवारात आम्ही एकमेकांना सुखदुःख सांगतो. हा परिवार आम्हाला नातलगांपेक्षाही अधिक जवळचा, अधिक दृढ वाटतो. हवा हवासा करतो. अखेर हे बाबांचे घर आहे, प्रत्येकाचे हक्काचे माहेर.

प. पू. बाबांच्या प्रत्येक भक्ताला बाबांची सावली लाभो, हि त्यांच्याच चरणी प्रार्थना.

-सौ. संगीता मिलिंद गुप्ते, कोथरूड, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *