UK मध्ये बाबांच्या अस्तित्वाची जाणिव

|| श्री ||

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”. स्वामींशी माझा संबन्ध हा माझ्या लग्नानंतर आला. माझं सासर हे स्वामींचे भक्त आहेत.

आम्ही म्हणजे मी, माझा नवरा राहुल आणि माझा मुलगा क्रिश असे आम्ही तिघे मार्च २०१७ मध्ये क्रिशच्या शाळेला १८ दिवसांच्या सुट्टीसाठी भारतात यायला निघालो. त्यावेळेस तिकीट खूप महाग होते. पण खूप प्रयत्न करून आम्हाला स्वस्तातले तिकीट मिळाले. त्यावेळी राहुलने मला आपल्याला पुण्याला १३ तारखेला किर्तीकडे जायचं आहे असे सांगितले. मी, का? असे विचारले असता, त्याने किर्तीकडे बाबांचा उत्सव आहे, असे सांगितले. मला त्यावेळेला बाबांबद्दल एवढं काहीच माहिती नव्हतं. मला अंधुकसं आठवतंय कि एकदा डोंबिवलीला जाताना आईनी (माझ्या सासू) आणि जयू आत्यांनी (माझ्या आत्ये सासू) मला या बाबांबद्दल सांगितलं होता. बस्स एवढीच मला बाबांबद्दलची माहिती होती.

तर आम्ही ठरल्याप्रमाणे १३ तारखेला सकाळी किर्तीकडे पुण्याला गेलो, तोपर्यंत माझ्या मनात बाबांबद्दल कोणतीच भावना नव्हती. पुण्याला जाऊन किर्तीकडे, नुपूरला भेटता येईल आणि मजा करायची एवढेच माझ्या डोक्यात होते. तिथे गेल्यावर घरातलं प्रसन्न वातावरण, फुलांचा, अगरबत्तीचा सुगंध, भक्तांची गर्दी, धावपळ ह्या सगळ्यांनी घर एकदम भारावून गेलं होत. मला स्वतःला घरात असं पूजेचं पवित्र वातावरण प्रचंड आवडतं. त्यावेळेला मी प्रथमच बाबांची मूर्ती पहिली. माझ्या माहेरी अनिरुद्ध जोशींची (बापू) यांची अशीच पूजा होते. त्यामुळे ह्या वातावरणाशी मी एकरूप झाले होते. बाबांच्या मूर्तीच्या खाली आणखीन ७ छोट्या मुर्त्या होत्या. मी उत्सुकतेने नूपुरला विचारले पण, कि ह्या एवढ्या मुर्त्यांचे काय करणार? त्यावर ती म्हणाली, “ह्या काही भक्तांच्या घरी जाणार आहेत.” त्यानंतर आम्ही सगळे बाबांची पालखी घेऊन साई मंदिरात गेलो. घरात आरती करत असताना नुपूरने मला अचानक बाबांना वारा घाल असे सांगितले. मी तिने सांगितल्याप्रमाणे केले. आरती झाल्यावर मी, राहुल आणि मराठे काकू प्रसाद वाटत गप्पा मारत बसलो असताना अचानक किर्ती आमच्याकडे आली आणि म्हणाली कि, “बाबांची जी सातवी मूर्ती आहे ती तुमच्याकडे जाणार आहे, तर तुम्ही ती नेणार का?” आम्ही दोघेही क्षणाचाही विलंब न करता, “का नाही नेणार !!” असे म्हणालो. देव स्वतःहून आपल्याकडे वळून आला आहे, तर त्यांना आपण नाही का म्हणायचे? असं किर्तीला आम्ही सांगितले. माझ्या मनात त्यावेळेला एक शंका आली, ती अशी कि, आपल्याकडून त्यांची सेवा नीट केली जाईल ना? तर त्या माझ्या प्रश्नच निरसन पण बाबांनीच केलं. माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित राहण्या आधीच बाबांनी किर्तीला सांगितले कि राहुलची बायको माझं सगळं नीट करेल. त्यांचा हा माझ्याविषयीचा विश्वास मला थक्क करणारा होता. किर्तीकडे झालेला हा सोहळा मला माझे गुरु बापूंच्या पादुका पूजनासारखा वाटला आणि तसे मी नूपुरला सांगितलेही..

बाबांची मूर्ती घेऊन आम्ही इंग्लंडला परत आलो. मी, राहुल आणि क्रिशने बाबांची मनोभावे आमच्या परीने व्यवस्थित अशी प्रतिष्ठापना केली. राहुल हा सतत कामानिमित्त फिरतीवर असतो, त्यामुळे घरात मी आणि क्रिश माझा ४ वर्षांचा मुलगा असे आम्ही दोघेच असतो. स्थापना झाल्यावर राहुल त्याच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता, पण त्यावेळी मला घरात सतत कुणीतरी वावरतंय असा भास व्हायला लागला. बाबांच्या स्थापनेपूर्वी असा भास मला कधीच जाणवला नव्हता पण, मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर कुणीतरी घरात फिरतंय असं प्रकर्षाने जाणवायला लागलं. अगदी कुणीतरी वाऱ्याच्या वेगाने ये-जा करतंय असे वाटत होतं. मला माझ्या स्वतःच्या घरात एवढी भीती कधीच वाटली नव्हती. मी घाबरून सतत किचनमधे काम करत असताना, क्रिशला हाक मारत राहायचे. काम करत असताना मागून कुणीतरी येतंय म्हणून सतत मागे वळून बघायचे. झोपताना पण मी सगळे दिवे लावून झोपायला लागले, तरी काही केल्या भीती काही जात नव्हती. बरेच वेळा मी रात्रीची भारतात असणाऱ्या माझ्या आईला, सासूला फोन करून मुद्दाम बोलत बसत असे. एकदा मी असाच रात्री नुपूर ला फोन केला, आणि तिला पण हे सांगितले. तिच्याशी बोलत असताना सुद्धा मला सतत वाऱ्यासारखं कुणीतरी वर चालून येतंय असं जाणवत होतं. मी तिला सांगितलंही कि, पहा कुणीतरी धावत येतंय. मी तिला सांगितलं मला खूप भीती वाटतेय. हे असं का होतंय? त्यावर ती म्हणाली तू उद्या सकाळी बाबांच्या मूर्ती समोर उभी राहून सांग कि, “बाबा तुमचे अस्तित्व मी मान्य केले आहे, मला घाबरवू नका, तूमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या.” मी दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलं काम हेच केलं, मी बाबांपुढे हात जोडून प्रार्थना केली, आणि अक्षरशः त्या दिवसापासून त्या हालचाली, ते आवाज, बंद झाले, माझी भीती संपली.

पुढे एकदा किर्तीबरोबर या विषयावर बोलत असताना ती मला म्हणाली, कि असच एकदा ती प्रार्थना करताना तिच्या मनात विचार आला आणि ती बाबांना बोलली होती कि, “खरंच तुम्ही सगळ्या भक्तांकडे जाणार आहेत का?” मला वाटतं तिच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर बाबांनी स्वतःच अस्तित्व माझ्या इंग्लंडमधील घरी दाखवून दिलं. 

“जिथे जिथे माझी भक्ती अगदी मनापासून केली जाईल, तिथे तिथे माझं अस्तित्व जाणवेल!!” 

       खरं पाहता आम्ही आमच्या, आपल्या लोकांच्या, मायेच्या आणि आधाराच्या छायेपासून दूर होतो, पण बाबांच्या आमच्या घरात झालेल्या स्थापनेनंतर हि कमतरता पण दूर झाली.  

– समिधा राहुल चिटणीस, नॉटिंगहॅम, यू.के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *